सरपंचासाठी चढाओढ; मात्र सदस्यसपद कुणालाच नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 09:45 PM2017-09-24T21:45:37+5:302017-09-24T21:45:51+5:30
केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जितेंद्र दखने।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपने विकासाच्या विकेंद्रीकरणासाठी ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठीची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही राजकीय चिन्ह न वापरता ही निवडणूक लढविण्याचा फतवा देखील निघाल्याने राजकीय पक्षांची मोठी कोंडी झाली आहे. एकीकडे सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे, तर दुसरीकडे सदस्यपदासाठी उमेदवार सापडेनासे झाल्याने नेत्यांच्या नाकीनऊ आले आहेत.
जिल्ह्यात २५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम मागील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राजयकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे.
ग्रा.पं. ताब्यात घेण्यासाठी चढाओढ
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने काँग्रेस व राकाँला चांगली लढत दिली होती. मात्र, जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यात भाजपला अपयश आले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात भाजप-काँग्रेस-सेना व अन्य पक्षांना ताकद वाढवावी लागणार आहे.
ग्रामीण भागातील मतदारांची मते स्वत:कडे सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कसब पणाला लावत आहेत. मात्र, ग्रामपंचायत स्वत:च्याच ताब्यात ठेवण्यासाठी सरपंचपद मिळविण्याची नवी खेळी खेळली जात आहे. परिणामी आरक्षणानुसार सरपंचपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून सरपंचपदासाठी कोणीच इच्छुक नसल्याचे चित्र आहे. सरपंचपदावर विराजमान व्यक्तीविरूद्ध अविश्वास ठराव पारित झाल्यानंतरदेखील अन्य सरपंचाची निवड जनतेतूनच करावी लागणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
छोट्या वस्त्यांमधील सदस्यांना मिळेल का संधी ?
सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. मात्र, मतदानाची आकडेमोड लक्षात घेता गट ग्रामपंचायतीत समाविष्ट वाड्यांना सरपंचपद मिळण्याची आशा धुसर झाली आहे. सरपंचाच्या थेट निवडीमुळे गट ग्रामपंचायतींमध्ये पक्ष किंवा आघाड्यांद्वारे अधिक मतदारसंख्या असलेल्या गावांमधूनच सरपंचपदाचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना सरपंचपदाची संधी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. यापूर्वी सरपंचाची निवड प्रभागातील सदस्यांमधून केली जात असल्याने कोणत्याही प्रभागातील सदस्याला सरपंचपदाची संधी मिळत असे. निवडणूक झाल्यानंतर तडजोडीच्या राजकारणातून किंवा आघाडीच्या समझोत्याप्रमाणे छोट्या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना सरपंचपद दिले जात होते. मात्र, थेट सरपंचनिवडीमुळे एकूणच समीकरणे बदलली आहेत. गट ग्रामपंचायतींमध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक वाड्या असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश असतो. आता सरपंचाच्या थेट निवडीमुळे या वाड्या-वस्त्यांमधील सदस्यांना कितपत संधी मिळेल, हे निवडणुकीनंतरच खºया अर्थाने स्पष्ट होणार आहे. गटातटाच्या राजकारणाला या निवडणुकीत अधिक रंगत येईल, हे मात्र खरे.