भाकर गेली अन् नुडल्स आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:12 PM2019-02-27T23:12:35+5:302019-02-27T23:12:53+5:30
मायबोलीमुळे संस्कृती टिकून आहे. वऱ्हाडी बोली सुंदर, मधुर आणि देखणी आहे. वºहाडीचे माधुर्य अन्य कोणत्याच भाषेत नाही. मात्र, अलीकडे मराठी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जात नाही. मराठी भाषा दिन साजरा करण्याची पाळी का आली, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण भाषा बदलली की, संस्कृती बदलते. त्यामुळेच भाकर गेली अन् आता नूडल्स आले, अशी मिश्कील टीका कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी येथे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मायबोलीमुळे संस्कृती टिकून आहे. वऱ्हाडी बोली सुंदर, मधुर आणि देखणी आहे. वºहाडीचे माधुर्य अन्य कोणत्याच भाषेत नाही. मात्र, अलीकडे मराठी आणि वऱ्हाडी भाषा बोलली जात नाही. मराठी भाषा दिन साजरा करण्याची पाळी का आली, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण भाषा बदलली की, संस्कृती बदलते. त्यामुळेच भाकर गेली अन् आता नूडल्स आले, अशी मिश्कील टीका कवी विठ्ठल वाघ यांनी बुधवारी येथे केली.
शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, उच्च व तंत्र शिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, मराठी विभागप्रमुख मनोज तायडे, हेमंत खडके आदी उपस्थित होते.
विठ्ठल वाघ म्हणाले, मराठी भाषेला इतिहास, गौरव आहे. मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे शुद्धीकरण केले. परंतु, आता मराठी भाषेची भेसळ झाली. अलीकडे मराठी माणूस भाषेचे पोषाख परिधान करीत नाही. भाषा बोलत नाही. खानपान बदलले. मराठी भाषा बोलणे अपमानजनक वाटते. त्यामुळे संस्कृतीचा गळा घोटण्याची प्रक्रिया सुरू झाली. घरी वाढदिवस, उत्सवाचे प्रसंग असले की, आता भाकर मिळत नाही. नुडल्सने ती जागा घेतली. त्यामुळे संस्कृती टिकवायची असेल, तर मराठी भाषा बोलली पाहिजे. माय आणि मम्मी यातील फरक समजून घ्या. मुंबई, पुण्याकडेच केव्हाचीच मराठी भाषा संपली. खेड्यातील माणूस निरक्षर, अशिक्षित असल्यामुळेच मराठी भाषा जिवंत असल्याचा दावा वाघ यांनी केला.
‘माझ्या मायमराठीचा मला जिवापार छंद’, ‘बैलातील चैतन्याशी तिफण जोडते नाते’, ‘हिरवं लुगडं नेसली लाल बांगड्या हातात’, ‘पारंबी होजो लेका वडाले देजो टेका’ अशा सरस कवितांचे सादरीकरण करून त्यांनी मराठी भाषा संवर्धन, जतन करण्याचे आवाहन केले. यावेळी २७ प्रादेशिक बोलींच्या अभ्यासग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्रभारी कुलसचिव हेमंत देशमुख, संचालन हेमंत खडके यांनी केले.
तत्पूर्वी, दुपारी ३ वाजता शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतून दिंडी काढण्यात आली. पारंपरिक परिधान करून मुलेमुली यामध्ये सहभागी झाली होती. ही दिंडी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात वाजतगाजत नेण्यात आली.