पोलीस उपनिरिक्षकाच्या लेटलतिफीने बबलूच्या तडीपारीला 'ब्रेक'; आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

By प्रदीप भाकरे | Published: November 21, 2022 06:22 PM2022-11-21T18:22:06+5:302022-11-21T18:26:54+5:30

आदेश तमील न करता गेले रजेवर

'Break' on Bablu's Tadipari due to PSI's latelatif behavior; Show Cause Notice issued by the Commissioner | पोलीस उपनिरिक्षकाच्या लेटलतिफीने बबलूच्या तडीपारीला 'ब्रेक'; आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

पोलीस उपनिरिक्षकाच्या लेटलतिफीने बबलूच्या तडीपारीला 'ब्रेक'; आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

Next

अमरावती : फ्रेजरपुरा ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक गजानन राजमलू यांच्या प्रशासकीय लेटलतिफीमुळे बबलू गाडे या कुख्यात गुन्हेगाराच्या तडीपारीला अर्धविराम मिळाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी १७ ऑक्टोबरच्या आदेशाने बबलू गाडे याला तडीपार केले. तो आदेश राजमलू यांना तमील करायचा होता. मात्र, तो न झाल्याने त्याने ६ नोव्हेंबर रोजी माजी नगरसेवकाच्या मुलावर तलवार चालविली. तो कुख्यात एवढयावरच न थांबता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. सबब, राजमलू यांना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

फ्रेजरपुरा हद्दीतील आदित्य वाईन शॉपमध्ये ६ नोव्हेंबर रोजी दुपारी चाकू व तलवार चालली होती. यात सूरज ऊर्फ गोलू भारत चौधरी व बबलू गाडे (दोघेही रा. यशोदानगर) हेजखमी झाले होते. यात बबलू गाडे याच्या आईच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी गोलू चौधरी व माजी नगरसेवक भारत चौधरी यांच्याविरुद्ध, तर गोलू चौधरीच्या तक्रारीवरून बबलू गाडे व तीन अनोळखींविरुद्ध हाफ मर्डरचा एफआयआर नोंदविला.

दरम्यान, आरोपी गोलू चौधरी हा इर्विनमधून खासगी रुग्णालयात गेला. तेथून तो पळून गेला. तर, आरोपी बबलू गाडे हा पळून जाऊ नये म्हणून दोन पोलीस अंमलदारांना तो दाखल असलेल्या रुग्णालयात ‘वॉचर’ म्हणून पाठविले. मात्र, त्या दोन वॉचरच्या डोळ्यात धूळ फेकून बबलू गाडे याने ११ नोव्हेंबर रोजी पळ काढला. त्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली, तर त्या दोन वॉचर अंमलदारांना निलंबित करण्यात आले.

याप्रकरणाचा अधिक चौकशी करत असताना आरोपी बबलू गाडे याला पोलीस उपायुक्तांनी घटनेपुर्वी १७ ऑक्टोबरच्या आदेशाने शहर तथा जिल्हयातून तडिपार केले. तो आदेश तमील करण्याची, त्या आदेशाची अंमलबजावणी अर्थात बबलू गाडे याला ताब्यात घेऊन दुसऱ्या जिल्ह्यात सोडण्याची जबाबदारी मोस्ट एलिजिएबल म्हणून फ्रेजरपुराचे उपनिरिक्षक गजानन राजमलू यांच्याकडे देण्यात आली.

राजमलू रजेवर निघून गेले 

फ्रेजरपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो आदेश २० ऑक्टोबर रोजी राजमलू यांच्याकडे तमील करण्यासाठी देण्यात आला. मात्र, बबलू गाडे याला ताब्यात घेऊन त्याला परजिल्हयात न सोडता, राजमलू हे रजेवर गेले. त्यादरम्यान, त्यांनी आपली रजा देखील वाढवून घेतली. वास्तविक, रजेवर जाण्यापुर्वी राजमलू यांनी ती जबाबदारी दुसऱ्या सहकाऱ्यांकडे सोपवायला हवी होती, किंवा वरिष्टांच्या निदर्शनास आणून दयायला हवी होती. मात्र, तसे काही न करता राजमलू यांनी बबलू गाडेच्या तडीपारीचा आदेश स्वत:जवळ ठेवला. त्यामुळे बबलू मुक्तपणे विहरत राहिला. ६ नोव्हेंबरला त्याने तलवार चालविली. तर दवाखान्यातून पळ काढत तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची हिट विकेट देखील घेतली.

कारवाईची टांगती तलवार

तडिपारी आदेशाची अंमलबजावणी विहित वेळेत झाली असती, तर ३०७ चा गुन्हा रोखला जाऊ शकला असता. मात्र, अंमलबजावणीअभावी बबलूची तडीपारी थांबली. याबाबत पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी राजमलू यांना शो कॉज बजावली आहे. सीपींची स्ट्रॉंग पोलिसिंग पाहता राजमलू यांच्यावर कारवाईची टांगती आहे. मात्र, कारवाईच्या स्वरूपाबाबत खाकींमधून अनभिज्ञता दर्शविण्यात आली.

Web Title: 'Break' on Bablu's Tadipari due to PSI's latelatif behavior; Show Cause Notice issued by the Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.