कारागृहात दबंग कैद्यांच्या ‘हंडी’ला ब्रेक

By admin | Published: November 24, 2015 12:14 AM2015-11-24T00:14:13+5:302015-11-24T00:14:13+5:30

उत्तुंग पाषाण भिंतीच्या आत कारागृहात कैद्यांची सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या चालते.

Break in a prison inmates 'handy' | कारागृहात दबंग कैद्यांच्या ‘हंडी’ला ब्रेक

कारागृहात दबंग कैद्यांच्या ‘हंडी’ला ब्रेक

Next

अमरावती : उत्तुंग पाषाण भिंतीच्या आत कारागृहात कैद्यांची सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या चालते. मात्र, या स्थितीत काही दबंग कैद्यांवर अंकुश लावण्याचे काम सुरू झाले आहे. याच श्रृखंलेत बराकीत गरम आणि ताजे जेवण मिळावे, यासाठी ‘हंडी’ बनविण्याची परंपरा मोडीत काढण्यात आली आहे. बराकींची आस्कमिक झाडाझडती घेण्याचा सपाटा सुरू झाल्यामुळे ‘हंडी’ला ब्रेक लागला आहे.
कारागृहातील कैद्यांची दिनचर्या ठरली आहे. यात पहाटेची प्रार्थना, न्याहारी, जेवण, आंघोळ, खेळ, विश्रांती, रात्रीचे जेवण, झोपण्याची वेळही ठरलेली आहे. प्रशासनाच्या नियमावलीनुसारच कैद्यांना कारागृहात वावरावे लागते. परंतु रात्रीचे जेवण सायंकाळीच मिळत असल्याने कैद्यांना रात्रीच्या वेळी तेच थंड झालेले जेवण घ्यावे लागते. त्यामुळे बराकीतील काही दबंग कैदी रात्रीच्यावेळी वार्डन (सुरक्षा रक्षक), हवालदार, रक्षक आदींना हाताशी धरून गरम जेवण तयार करून अथवा वेगळी भाजी शिजविण्यासाठी ‘हंडी’ बनवितात. ही ‘हंडी’ बराकीच्या एका कोपऱ्यात कापड जाळून ऊब देऊन केली जाते. सायंकाळी मिळणारे जेवण रात्रीला या ‘हंडी’मध्ये गरम करून काही कैदी खातात. मात्र, हा प्रकार काही कैदीच करीत होते.
‘हंडी’ला सुरक्षा रक्षकाचे अभय मिळत होते. मात्र, कारागृहाचे अधीक्षक एस. व्ही. खटावकर यांनी ‘हंडी’ला पूर्णत: लगाम लावला आहे. अंतर्गत सुरक्षा अधिकाऱ्यांना बराकींची आस्कमिक झाडाझडती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे बराकीत कैद्यांकडे असलेले साहित्य, वस्तुंची तपासणी केली जात आहे.

नियमित झाडाझडती सुरू
अमरावती : या झाडाझडतीत कैद्यांजवळ नियमबाह्य साहित्य, वस्तू मिळाल्यास कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. या भीतीपोटी ‘हंडी’ बंद करण्यात आली आहे. कारागृहात अंडा बराक बंद असून यात कोणत्याही कैद्याला जेरबंद करण्यात आलेले नाही. सर्वांनाच सामान्य कैदी म्हणून वागणूक देण्यात येते. त्यामुळे मुंबई बॉम्बस्फोट असो, २६/११चा दहशतवादी हल्ला वा प्रसिध्द खून खटल्यातील आरोपी सर्वांना समान वागणूक कारागृहात मिळत आहे. मात्र, ‘हंडी’ हा प्रकार बराकीत रात्रीच्यावेळी चालत होता. ही बाब कारागृह अधीक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी नियोजनबध्दपणे ती बंद करण्यात आघाडी घेतली आहे. कारागृहात अलिकडे ११०० कैदी जेरबंद असून ५० पेक्षा जास्त महिला बंदी येथे आहेत.

दर तासाने संचार फेरी : सुरक्षा अधिकाऱ्यांवर जबाबदारी
डायनिंग टेबलच्या जेवणाला लगाम
काही वर्षांपूर्वी येथील मध्यवर्ती कारागृहात डायनिंग टेबवर गरम आणि ताजे जेवण देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला होता. या उपक्रमाचा शुभारंभ माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र डायनिंग टेबवरील जेवणात कैदी एकत्र येत होते. याचा फायदा काही कैदी घ्यायचे. त्यामुळे कारागृहात अप्रिय घटना, कट शिजावयास वाव मिळत होता. परिणामी डायनिंग टेबलवरील जेवणही बंद करण्यात आले आहे. आता कैद्यांना जेवण हे बराकीच्या परिसरातच दिले जात आहे.

काय असते ‘हंडी’ ?
विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेले कैदी बराकीत जेरबंद असताना जेवण हे गरम अथवा ताजे मिळावे, यासाठी बराकीच्या कोपऱ्यात कापड, पेपर जाळून वाटीत शिजवतात. काही दबंग कैदी कारागृहातील दुकानातून साहित्य आणून भाजी तयार करतात. प्रत्येक बराकीत चार ते पाच कैदी एकत्र येऊन ‘हंडी’ तयार करीत होते. मात्र या प्रकारामुळे कैद्यांमध्ये सापत्नेची भावना निर्माण होऊन आपसात द्वेष, भांडण होण्याची शक्यता लक्षात घेता ‘हंडी’ प्रकाराला कारागृह प्रशासनाने आळा बसविला आहे.

कारागृहात सुधारणा व पुनर्वसनासाठी प्रशासन कार्यरत आहे. कैद्यांमध्ये चांगल्या बाबी बिंबवण्यासाठी काही कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. बरकीत ‘हंडी’ गरम जेवण या प्रकाराला पूर्णपणे लगाम बसला आहे. त्याकरिता सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
- एस. व्ही. खटावकर,
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह.

Web Title: Break in a prison inmates 'handy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.