‘लिव्ह इन’ला ब्रेक; प्रेयसीच्या घरासमोर मनगटावर ब्लेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 11:40 PM2022-11-16T23:40:42+5:302022-11-16T23:49:23+5:30
तू जर मला भेटली नाही, तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करतो, अशी धमकी तिला देण्यात आली. दरम्यान, तरुणी ही घरी असताना आरोपी अमनने तिच्या आईच्या मोबाइलवर कॉल केला. मी तुझ्या घरी येतो व माझ्या जीवाचे बरे-वाईट करतो, अशी धमकी दिली. थोड्या वेळाने आरोपी तिच्या घरासमोर आला. तिला आवाज दिला. मात्र, तिने आरोपीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोपीने स्वत: त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर ब्लेडने चिरे मारले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रियकरासोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना वाईट अनुभव पदरी पडल्याने निराश झालेल्या प्रेयसीने आईचे घर गाठले. मात्र, प्रियकराने पुन्हा ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा तगादा लावला. त्यामुळे प्रियकराने तिच्या आईचे घर गाठून तेथे स्वत:च्या हाताच्या मनगटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमन रामराव रौराळे (२६, समाधाननगर, अमरावती) याच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न करणे, विनयभंग, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपीचे प्रेमसंबंध असल्याने ते मार्च २०२२ पासून पुढे तीन महिने ‘लिव्ह इन’मध्ये राहिले. आरोपीच्या आई-वडिलांसोबत ती राहिली. त्या काळात आरोपीकडून तिला शारीरिक व मानसिक त्रास झाला. त्यामुळे तिने आरोपीसोबत ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये न राहण्याचे ठरविले. आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी तरुणी बहिणीच्या घरी परतली. तेथून २ नोव्हेंबर रोजी ती आईकडे राहण्याकरिता आली. त्यावेळीदेखील तो तिच्या आईच्या घरी येऊन धडकला. तिला ‘लिव्ह इन’ रिलेशनमध्ये राहण्याबाबत धमकावत होता. तिच्या मोबाइलवर वारंवार कॉल करून तिचा पाठलागदेखील केला.
अशी घडली घटना
- तू जर मला भेटली नाही, तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करतो, अशी धमकी तिला देण्यात आली. दरम्यान, तरुणी ही घरी असताना आरोपी अमनने तिच्या आईच्या मोबाइलवर कॉल केला. मी तुझ्या घरी येतो व माझ्या जीवाचे बरे-वाईट करतो, अशी धमकी दिली. थोड्या वेळाने आरोपी तिच्या घरासमोर आला. तिला आवाज दिला. मात्र, तिने आरोपीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोपीने स्वत: त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर ब्लेडने चिरे मारले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने मंगळवारी सायंकाळी खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तेथील एएसआय विजय पांडे यांनी तिची तक्रार दाखल करून घेतली. तथा आरोपी अमनला तातडीने अटक केली.