श्रद्धासारखा प्रकार होता होता राहिला; ‘लिव्ह इन’रिलेशनशिपला ब्रेक लागला; प्रेयसीच्या घरासमोर मनगटावर मारले ब्लेड!
By प्रदीप भाकरे | Published: November 16, 2022 06:28 PM2022-11-16T18:28:44+5:302022-11-16T18:35:06+5:30
खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील घटना: पाठलाग करून विनयभंगही
अमरावती : प्रियकरासोबत ‘लिव्ह इन’ मध्ये राहत असताना वाईट अनुभव पदरी पडल्याने निराश झालेल्या प्रेयसीने आईचे घर गाठले. मात्र, प्रियकराने पुन्हा ‘लिव्ह इन’मध्ये राहण्याचा तगादा लावला. त्यामुळे प्रियकराने तिच्या आईचे घर गाठून तेथे स्वत:च्या हाताच्या मनगटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही रक्तबंबाळ घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अमन रामराव रौराळे (२६, समाधाननगर, अमरावती) याच्याविरूध्द आत्महत्येचा प्रयत्न करणे, विनयभंग, शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी तरूणी व आरोपीचे प्रेमसंबंध असल्याने ते मार्च २०२२ पासून पुढे तीन महिने ‘लिव्ह इन’ मध्ये राहिले. आरोपीच्या आई वडिलांसोबत ती राहिली. त्या काळात आरोपीकडून तिला शारीरिक व मानसिक त्रास झाला. त्यामुळे तिने आरोपीसोबत ‘लिव्ह इन’ रिलेशनशिपमध्ये न राहण्याचे ठरविले. आरोपीच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी तरूणी बहिणीच्या घरी परतली. तेथून २ नोव्हेंबर रोजी ती आईकडे राहण्याकरीता आली. त्यावेळी देखील तो तिच्या आईचे घरी येऊन धडकला. तिला ‘लिव्हईन रिलेशन’मध्ये राहण्याबाबत धमकावित होता. तिच्या मोबाईलवर वारंवार कॉल करुन तिचा पाठलाग देखील केला. तिला भेटण्यासाठी देखील त्याने तगादा लावला. त्याला नकार दिला असता त्याने आपल्याला शिविगाळ करुन मारण्याच्या धमक्या दिल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.
अशी घडली घटना
तू जर मला भेटली नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करतो, अशी धमकी तिला देण्यात आली. दरम्यान, तरूणी ही घरी असताना आरोपी अमनने तिच्या आईच्या मोबाईलवर कॉल केला. मी तुझ्या घरी येतो व माझे जीवाचे बरे वाईट करतो. अशी धमकी दिली. थोड्या वेळाने आरोपी तिच्या घरासमोर आला. तिला आवाज दिला. मात्र तिने आरोपीच्या गोष्टीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आरोपीने स्वत: त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर ब्लेडने चिरे मारले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने मंगळवारी सायंकाळी खोलापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. तेथील एएसआय विजय पांडे यांनी तिची तक्रार दाखल करून घेतली. तथा आरोपी अमनला तातडीने अटक केली. नंतर त्याची जामीनावर मुक्तता करण्यात आली.