वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:12 AM2021-09-13T04:12:26+5:302021-09-13T04:12:26+5:30

असाईनमेंट अमरावती : वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर आधी केवळ दंड भरून सुटका होत होती. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये आता ...

Breaking traffic rules can lead to license revocation | वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द

वाहतूक नियम तोडल्यास लायसन्स होऊ शकते रद्द

Next

असाईनमेंट

अमरावती : वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर आधी केवळ दंड भरून सुटका होत होती. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये आता लायसन्सही रद्द केले जात आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केल्या. नव्या सुधारणांसह मोटार वाहन (सुधारणा) कायदा १ सप्टेंबर २०१९ पासून लागू करण्यात आला आहे.

तुम्ही गाडी चालविताना सीटबेल्ट लावला नसाल, तर आता १०० रुपयांऐवजी १००० रुपये दंड भरावा लागेल आणि जर दुचाकी चालविताना हेल्मेट घातले नसेल, तर १०० ऐवजी १००० रुपये दंड भरावा लागेल. शिवाय, वाहन परवानाही तीन महिन्यांसाठी रद्द केला जाईल. या कायद्यातील नव्या तरतुदींमुळे वाहन नियम तोडल्यास होणाऱ्या शिक्षा आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

///////////////

हे नियम मोडल्यास लायसन्सचे निलंबन

१) दुचाकी चालविताना हेल्मेट घातले नसल्यास आधी केवळ १०० रुपये दंड आकारला जात होता. आता १००० रुपये दंड आणि तीन महिन्यांपर्यंत वाहन परवाना रद्द करण्यात येईल.

२) ॲम्ब्युलन्ससारख्या आपत्कालीन वाहनांचा रस्ता अडविल्यास १० हजार रुपये किंवा त्याहून दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षाही ठोठावल्या जातील. तुमचे लायसन्सदेखील जप्त होऊ शकते.

३) मोठमोठ्याने हॉर्न वाजविल्यास पहिल्यांदा एक हजार रुपयांचा दंड आणि पुन्हा हाच गुन्हा केल्यास दोन हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. हाच गुन्हा पुन्हा केल्यास चार हजार रुपयांपर्यंत दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील.

४) वाहन चालविताना मोबाईलवर बोलल्यास, चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेकिंग केल्यास किंवा रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास एक हजार ते पाच हजार रुपये दंड किंवा ६/१२ महिने तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होतील. तुमचे लायसन्सदेखील जप्त होऊ शकते.

///////

अशी होते कारवाई

दारू पिऊन किंवा अमली पदार्थाच्या नशेत वाहन चालविल्यास पहिल्या अपराधाबद्दल सहा महिने कैद किंवा दंड दोन हजार रुपये किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तसेच ड्रायव्हिंग लायसेन्स निलंबित किंवा रद्द होते. रक्तातील मद्याकांची पातळी ही १०० मिलिलिटर रक्तात ३० मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास कायद्याने गुन्हा आहे. पुन्हा त्याच व्यक्तीने हा गुन्हा केल्यास २२ (२) कलमान्वये लायसन्स कायमचे रद्द होते. त्यासाठी वाहतूक शाखेकडून कारवाईची माहिती आरटीओला देण्यात येते.

/////////

आधी तीन महिने, नंतर कायमस्वरूपी !

वाहतूक नियम मोडल्यास संबंधित वाहनचालकाकडून दंड वसूल केला जातो. वाहतूक पोलीस तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द करू शकतात. परंतु, वाहनचालक अनेकदा नियमभंग करीत आहे, असे आढळल्यास वाहतूक पोलीस संबंधिताचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस करू शकतात.

////////////

वाहतूक पोलीस प्रमुखाचा कोट

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचे परवाने तीन महिने निलंबित करण्याच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी पोलीस यंत्रणेला केल्या आहेत.

नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे परवाने किमान तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करता येते.

अनिल कुरळकर, प्रभारी सहायक आयुक्त

वाहतूक शाखा

///

Web Title: Breaking traffic rules can lead to license revocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.