आॅगस्टच्या मध्यांतरात सलग सुट्यांची मेजवानी
By Admin | Published: August 11, 2016 12:04 AM2016-08-11T00:04:32+5:302016-08-11T00:04:32+5:30
आॅगस्ट महिन्याचा दुसरा विकेंड नोकरदार वर्गासाठी सुटयांची मेजवानी घेऊन येणार आहे.
चंगळ : एक दिवस रजा घेतल्यास सहा दिवस सुटी
अमरावती : आॅगस्ट महिन्याचा दुसरा विकेंड नोकरदार वर्गासाठी सुटयांची मेजवानी घेऊन येणार आहे. पुढील आठवड्यात पाच दिवसांच्या सलग सुट्यांचा योग आहे. यंदाच्या वर्षात येत असलेल्या सलग सुट्यांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरत आहे. दुसरा शनिवार व रविवारच्या सुट्यांमुळे नोकरदारांना सलग सुट्यांचा आनंद घेता येईल.
दुसरा शनिवार ते पारशी नववर्ष दिनाच्यामध्ये एक दिवसाची रजा घेतल्यास ही सुटी उपभोगता येणार आहे. १३ आॅगस्टला दुसरा शनिवार आहे. त्यानंतर लगेच रविवारला जोडून सोमवारी स्वातंत्र्यदिन आहे. १६ आॅगस्ट सोडला तर लगेच दुसऱ्या दिवशी १७ रोजी पारशी नववर्षारंभाची सार्वजनिक सुटी आहे. रक्षाबंधन असल्याने स्थानिक सुटी आहे. त्यामुळे १६ आॅगस्टची रजा घेणाऱ्यांना शनिवार ते गुरुवार अशी सलग ६ दिवसांची सुटी उपभोगता येणार आहे. महिला नोकरदारांसाठी तर हे पर्व आणखीच महत्त्वाचे व हमखास सुटी मिळेल, असे आहे. कारण, १६ आॅगस्टला मंगळागौरीचे पूजन तर १८ आॅगस्टला रक्षाबंधन आहे. यादिवशी ज्या महिला सुटीवर असतील त्यांना सलग सहा दिवसांची सुटी उपभोगता येणार आहे. गुरुपौर्णिमेपासून सुरु होणारे सण उत्सवाचे दिवस पावसाळ्याच्या काळात येतात. जुलै ते सप्टेंबर हे तसेही छोट्या-मोठ्या पर्यटन सफारीचे महिने मानले जातात. याच साखळीत स्वातंत्र्यदिनाच्या अवतीभोवती येणाऱ्या या सहा दिवसाच्या सुट्यांचा चांगला उपयोग संबंधितांना घेता येईल, यामुळे नोकरदार वर्ग आनंदला आहे. (प्रतिनिधी)
पीकनिक-सहलींसाठी योग्य पर्वणी
हिरवा शालू नेसलेला निसर्ग आणि रिमझिम बरसणाऱ्या सरी, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे श्रावण महिन्याच्या या काळात वाट्याला येणारी दोन-तीन दिवसांची रजाही धमाल घडवून आणण्यास कारणीभूत ठरणार आहे. स्वातंत्र्य दिनाला जोडून येणाऱ्या सुटीत अशाच काहीशा पीकनिक व सहलींच्या योजना आखल्या जाण्याची शक्यता आहे.
अशा आहेत सुट्या
१३ आॅगस्ट - दुसरा रविवार
१४ आॅगस्ट - साप्ताहिक सुटी
१५ आॅगस्ट - स्वातंत्र्य दिन
१७ आॅगस्ट - पारशी नववर्ष दिन
१८ आॅगस्ट - रक्षाबंधन