धापा टाकत गाठावे लागते प्लॅटफॉर्म, स्वयंचलित जिने केव्हा सुरू करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:17 AM2021-09-06T04:17:06+5:302021-09-06T04:17:06+5:30
बडनेरा : बडनेरा रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या तसेच प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. तब्बल दीड वर्षांपासून कोरोनामुळे बंद ...
बडनेरा : बडनेरा रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या तसेच प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. तब्बल दीड वर्षांपासून कोरोनामुळे बंद असणारे स्वयंचलित जिने धूळखात आहेत. दुसरीकडे वयोवृद्ध, आजारी प्रवाशांना मात्र धापा टाकत प्लॅटफॉर्म गाठावे लागते. रेल्वे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे.
पॅसेंजर गाड्या वगळता दोन महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या जलद तसेच अतिजलद रेल्वे गाड्या बडनेरा रेल्वे स्थानकावरून इतरत्र धावण्यास सुरुवात झाली आहे. दरदिवशी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. कोरोनामुळे दीड वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकावरील नवीन पादचारी पुलाच्या बाजूने असणारे स्वयंचलित जिने बंद करण्यात आले होते. या रेल्वे स्थानकाला दोन पादचारी पूल आहेत. कोरोनाकाळात रेल्वेगाड्या ठप्प असल्यामुळे रेल्वे स्थानकावर जाणारे सर्व मार्गच बंद करण्यात आले होते. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर बऱ्याच रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या. प्रवाशांची संख्यादेखील वाढीस लागली.
‘प्रवाशांच्या दृष्टिकोनातून बंद प्रवेशद्वार केव्हा उघडणार?’ असे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते त्यानंतर एका पादचारी पुलावरील सर्व मार्ग प्रवाशांना रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मोकळे करण्यात आले. सध्या नवीन पादचारी पूल व त्यालाच लागून असणारे स्वयंचलित जिने बंद ठेवण्यात आले आहेत. वयोवृद्ध विशेषत: पायाचा त्रास असणारे तसेच आजारी प्रवाशांना पायऱ्या चढून रेल्वे प्लॅटफॉर्म गाठावे लागते. त्यांना होणारा मनस्ताप रेल्वे प्रशासनाने दूर करावा. रेल्वे गाड्या तसेच प्रवाशांची संख्या पूर्वीप्रमाणेच पूर्वपदावर येत आहे. आजारपणाच्या नियमित तपासण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येत प्रवासी मुंबईला जात असतात. स्वयंचलित जिन्यांवर शासनाचे लाखो रुपये खर्च झाले आहेत.