दीड हजारांची लाच, महिला सरपंच, पती, भासरा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:56+5:302021-08-29T04:15:56+5:30
धामणगाव रेल्वे (अमरावती) : गावात तार कंपाऊंड (चेन लिंकिंग) च्या मजुरीच्या धनादेशावर स्वाक्षरीसाठी दीड हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ...
धामणगाव रेल्वे (अमरावती) : गावात तार कंपाऊंड (चेन लिंकिंग) च्या मजुरीच्या धनादेशावर स्वाक्षरीसाठी दीड हजार रुपयांची लाच मागणाऱ्या महिला सरपंच, पती व भासऱ्याला लाचलुचपतप्रतिबंधक विभागाने शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास अटक केली. हा प्रकार धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका पटाचे येथे घडला.
सोनाली संजय पिल्हारे असे अटक करण्यात आलेल्या उच्चशिक्षित महिला सरपंच, संजय पिल्हारे असे पतीचे व विजय पिल्हारे असे भासऱ्याचे नाव आहे. तक्रारदार मजुराने गावातील तार कंपाऊंड व नालीचे बांधकाम मार्च २०२१ मध्ये पूर्ण केले. या कामाच्या मजुरीचा २२ हजार ७०० रुपयांचा धनादेश सेंट्रल बँकेत तक्रारदाराच्या नावे मंजूर झाला. या धनादेशावर ग्रामसचिव आडे यांनी स्वाक्षरी केली. मात्र, सरपंच सोनाली पिल्हारेची सही आवश्यक होती. या महिलेने दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. लाचलूतपत प्रतिबंधक विभागाने १८ व १९ ऑगस्ट रोजी या घटनेची शासकीय पंचासह तपासणी केली. संजय पिल्हारे व विजय पिल्हारे यांनी २२ हजार ७०० रुपयांचा धनादेश लाचेच्या रकमेसाठी स्वत:जवळ ठेवून घेतला असल्याचे पंचांसमोर सिद्ध झाले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांना अटक करून तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस निरीक्षक संतोष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल कडू, माधुरी साबळे, विनोद कुंजाम, शैलेश कडू, नीलेश महेंगे, सतीश किटुकले, प्रदीप बारबुद्धे यांनी केली.