लाचखोरीत विभाग पाचव्या क्रमांकावर
By admin | Published: January 10, 2016 12:25 AM2016-01-10T00:25:06+5:302016-01-10T00:25:06+5:30
राज्यात मागील दोन वर्षांत लाचखोरांची संख्या वाढली आहे. ‘अडत्यां’ची आर्थिक मुस्कटदाबी करून स्वत:चे उखळ पांढरे ...
पुण्याचे अढळस्थान कायम : जनजागृतीने तक्रारीही वाढल्या
अमरावती : राज्यात मागील दोन वर्षांत लाचखोरांची संख्या वाढली आहे. ‘अडत्यां’ची आर्थिक मुस्कटदाबी करून स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्यांमध्ये अमरावती विभागाने पाचवा क्रमांक पटकावला आहे.
गेल्या २ वर्षांत लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये पुणे विभाग अव्वल आहे. त्यापाठोपाठ नाशिक आणि औरंगाबादचा क्रमांक लागतो. अधिकारी कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तींच्या भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी राज्यात अमरावतीसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, ठाणे, नांदेड आणि मुुंबई येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी अमरावतीसह अकोला, यवतमाळ, वाशीम आणि बुलडाणा जिल्हा संलग्न आहे. पोलीस अधीक्षक महेश चिमटे यांच्या नेतृत्वात सन २०१५ मध्ये १३८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. तक्रारीनंतर यशस्वी होणाऱ्या सापळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात तक्रारकर्ते समोर येत आहेत. मागील दोन वर्षांत तब्बल २,५८६ लाचखोरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. मात्र भ्रष्ट्राचार वा लाचखोरीला आळा असलेला नाही. अजुनही ‘बिदागी’ दिल्याशिवाय फाईल हलत नाही. साध्या कोतवालापासून थेट उच्चाधिकारी ‘एसीबी’च्या सापळ्यात अडकल्याने लाचखोरीचे पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा प्रत्यय येतो. लाच मागितल्याच्या तक्रारीची शहानिशा करून ‘एसीबी’ सापळे रचते. भ्रष्टाचार वा लाचखोरीला पायबंद घालण्यासाठी हा प्रयत्न होतो. तथापि प्रत्यक्षात गत दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे दिसत आहे. त्याअनुषंगाने जनजागृतीची गरज आहे. (प्रतिनिधी)