लाचखोर कनिष्ठ सहायक अटकेत
By admin | Published: November 9, 2016 12:18 AM2016-11-09T00:18:42+5:302016-11-09T00:18:42+5:30
प्रलंबित वेतनाचे बिल काढून देणाऱ्या कनिष्ठ सहायकास दोन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली.
दोन हजारांची लाच : कावली दवाखान्यातील घटना
धामणगाव रेल्वे : प्रलंबित वेतनाचे बिल काढून देणाऱ्या कनिष्ठ सहायकास दोन हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. प्रमोद नामदेव डाफ (५०,रा. कृष्णा कॉलनी, अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारकर्ता हे धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अॅलोपॅथी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनाचे देयक कनिष्ठ सहायक प्रमोद डाफ यांच्याकडे होते. देयके तयार करून ‘आॅनलाईन फॉरवर्ड’ करण्याचे काम ते करीत होते.
६ आॅक्टोबरला केली होेती तक्रार
अमरावती : तक्रारकर्त्याचे आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्याचे प्रलंबित बिल आरोपी प्रमोद डाफ यांनी तयार करून पंचायत समितीकडून मंजूर करून घेतले. त्यानंतर वेतनाची रक्कम तक्रारकर्त्याच्या बँक खात्यात जमा झाली. मात्र, वेतनाचे बिल काढून देण्याच्या मोबदल्यात आरोपींनी तक्रारकर्त्यास दोन हजारांची लाच मागितली.
याबाबत ६ आॅक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी प्रमोदने तक्रारदाराला लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ८ नोव्हेंबर रोजी सापळा रचला असता आरोपी प्रमोद अॅलोपॅथी दवाखान्यात तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना आढळून आला. त्यावेळी एसीबी पथकाने आरोपीला रंगेहात पकडले.
पोलीस अधीक्षक महेश चिमटे व अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राहुल शिरे, ज्ञानेश्वर उराडे, राहुल तसरे तसेच हवालदार श्रीकृष्ण तालन, पुरूषोत्तम बारड, शिपाई प्रमोद धानोरकर, चालक पोलीस नाईक, अकबर खान यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणचा अधिक तपास एसीबी करीत आहे. (प्रतिनिधी)