दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय वधुपिता
By admin | Published: January 17, 2015 10:51 PM2015-01-17T22:51:45+5:302015-01-17T22:51:45+5:30
दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे.
अमरावती : दरवर्षीच्या नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अर्धेही उत्पन्न झालेले नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण बाजारपेठेवर झाला आहे. आर्थिक व्यवहार मंदावले आहे. दुष्काळच्या झळामध्ये वधुपिता होरपळत आहे. उपवर-वधूचे लग्न लांबणीवर पडत आहे. प्रसंगी नोंदणी विवाहाला प्राधान्य दिले जात आहे.
मागील वर्षीचा हंगाम अतिपावसामुळे उद्ध्वस्त झाला. यंदा पावसाअभावी खरीप व रबीच्या सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांवर कमी आलेली आहे. जिल्ह्यातील १९६२ गावांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. खरिपाचा हंगाम दोन महिने उशिरा सरू झाल्याने रबीचा हंगामही माघारला आहे. वातावरणात धुके, कडाक्याची थंडी, ढगाळ वातावरण, कधी अकाली पाऊस जमिनीत नसणारी आर्द्रता, अद्याप फुलोऱ्यावर नसलेला हरभरा, तुरीवर शेंगा पोखणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव, संत्राच्या आंबिया बहराला न ताण बसल्याने कमी आलेली फूट, मृग बहराचे फळ कमी भावाअभावी अद्याप झाडावर यासारख्या अन्य समस्यांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीमध्ये पेरणीचा खर्चदेखील निघत नाही. जगाव कसं? मुला-मुलींचे शिक्षण, दररोजचा उदर निर्वाह, उपवर-मुलामुलींचे लग्नकार्य कसे करावे, या विवंचनेत वधुपिता आहे.
मंगल कायालये, कॅटरर्स, कपडे दागिन्यांवर खर्च व कार्यक्रमासाठी उधळण करणे आजच्या परिस्थितीत शक्य नाही. यामुळे आठवड्यात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत झाल्या आहे. त्यांना आर्थिक मदतीची गरज असताना प्रचलित निकषाप्रमाणे मदत दिली जात आहे. तीही तुटपुंजी आहे. मागणीच्या ४० टक्के दुष्काळी निधी वितरित होणार आहे. ग्रामीण भागाचे अर्थचक्र हे शेतीपिकाच्या उत्पन्नावर आधारित असते. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत ४० टक्केही उत्पन्न नाही. शेतमालास आधारभूत किमतीएवढीही भाव मिळत नाही.
सोयाबीन, कापसाचे भाव कमी झाले आहे. व्यापारी बेभाव खरेदी करत सर्वत्र शेतकऱ्यांची कोंडी करीत असल्याने दुष्काळाच्या झळामध्ये आज शेतकरी होरपळला जात आहे. (प्रतिनिधी)