कौंडण्यपूर नदीवरील पूल जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 10:53 PM2017-08-23T22:53:59+5:302017-08-23T22:54:33+5:30
अमरावती-वर्धा जिल्ह्यांना जोडणारा श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पूल क्षतिग्रस्त झाला आहे.
रितेश नारळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुºहा : अमरावती-वर्धा जिल्ह्यांना जोडणारा श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पूल क्षतिग्रस्त झाला आहे. पुलावरील असलेले सिमेंटच्या रस्त्यातील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तर संरक्षक लोखंडी कठडे चोरून नेले असून येथे अपघात झाल्यास ते सरळ मृत्यूला निमंत्रण देणारेच ठरणार आहे.
वर्धा नदीवर असलेले वरूड बगाजी (निम्नवर्धा) धरणाची थोप कोंडण्यपूरपर्यंत आहे. यामुळे नदीला वर्षभर भरपूर पाणी असते. पुलावरून अधिक जड वाहने गेल्यामुळे तो खळखिळा झाल्याचे जाणवते. अनेकदा जड वाहनांच्या भारामुळे पूल हलल्याने येथे वाहनचालकांचे नियंत्रण सुटले आहे. पुलाची अवस्था दयनीय झाली असतानादेखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसते. यासंदर्भात अनेकदा मागणी करूनही या पुलाची दुरुस्ती करण्यात आली नाही. कोणतेही अधिकारी पुलाच्या पाहणीसाठी ईकडे फिरकतही नाहीत. या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे कधीही अपघात होण्याची दाट शक्यता नाकारतात येत नाही. उघड्या सळाखी दुचाकीच्या चाकात घुसल्यास व संरक्षक कठडे आधीच तुटले असल्यामुळे चालक थेट नदीत पडतील, अशी अवस्था आहे.
भाविकांची वर्दळ अन पुलाची चर्चा
देवी रुक्मिणीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया कौंडण्यपूर येथे वर्धा व नागपूर जिल्ह्यातून येणारे भाविक वर्धा नदीवरील हा पूल ओलांडूनच येतात. यामुळे वर्धा जिल्ह्यापर्यंत सुखकर असणारा प्रवास केवळ या पुलामुळे वाईट अनुभव देऊन जातो. येथे येणारे भाविक या पुलाची दुरुस्ती व्हावी, अशी चर्चा स्थानिकांशी करताना दिसतात. यामुळे देव दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या मनात प्रशासनाची खराब प्रतिमा तयार होत आहे.
अमरावती येथील बियाणी चौक ते कौंडण्यपूरपर्यंत या मार्गासाठी शासनाने १३० कोटींचा निधी मंजूर केला. दिवाळीनंतर काम सुरु होईल. कठठ्यांचे काम त्यात आहे. पूलदुरुस्तीसाठी आता निधी मंजूर होत नाही. तरीही आम्ही पुलावरील खड्डे बुजविण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू.
- दिनकर माहुरे, उपविभागीय अभियंता, सां.बा.वि.