येवदा-सातेगाव मार्गावरील पूल शेतकऱ्यांसाठी ठरतो जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:01+5:30
पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पुलावरून शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. या मार्गाने जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे. येवदा येथील हजारो शेतकऱ्यांना शेतीची कामे तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भूमिपूजन फलकही लागले होते.
अनंत बोबडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
येवदा : स्थानिक सातेगाव मार्गावरील पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन होऊनही बांधकामाला सुरुवात न झ्नाल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. अनेक वर्षांपासून लोकवर्गणीतून या पुलाची डागडुजी केली जाते. मात्र, आता हा पूल डागडुजीपलीकडे गेल्याने ग्रामस्थांच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या आहेत. या येवदा-सातेगाव रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत नादुरुस्त पुलावरून शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. या मार्गाने जीव मुठीत घेऊन रहदारी करावी लागत आहे. येवदा येथील हजारो शेतकऱ्यांना शेतीची कामे तसेच शेतमालाची वाहतूक करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भूमिपूजन फलकही लागले होते.
लेंडी नाल्यावरील पुलाचीही दुरवस्था
येवदा येथील लेंडी नाल्यावरील पुलाचीसुद्धा दयनीय अवस्था झाली आहे. या पुलावरून रहदारी करणे अवघड झाले आहे. या दोन्ही पुलांचे बांधकाम जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने करावे, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. यावर तात्काळ कार्यवाही करून पुलांचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथा क्रांतिदिनी ९ ऑगस्ट रोजी दुपारी प्रेतयात्रा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार व ग्रामस्थांनी दिला आहे.