संक्षिप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:12 AM2020-12-22T04:12:32+5:302020-12-22T04:12:32+5:30
सुमन अडबोल फोटो - अमरावती : राठीनगर येथील रहिवासी सुमन जगन्नाथ अडबोल (७४) यांचे दीर्घ आजाराने १८ डिसेंबर रोजी ...
सुमन अडबोल
फोटो -
अमरावती : राठीनगर येथील रहिवासी सुमन जगन्नाथ अडबोल (७४) यांचे दीर्घ आजाराने १८ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, जावई व बराच आप्तपरिवार आहे.
---------------
दुचाकीच्या धडकेत इसम ठार
परतवाडा : एकलासपूर येथे १८ डिसेंबर रोजी दुचाकी (एमएच २७ एजे ४७५६) च्या धडकेत गंभीर जखमी झालेले सोमाजी राजू जामूनकर (५६) यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी १९ डिसेंबर रोजी त्यांच्या सुनेने तक्रार दाखल केली. त्यावरून परतवाडा पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------
चारचाकीच्या धडकेत युवती गंभीर जखमी
परतवाडा : स्थानिक बीएसपी महाविद्यालयापुढे महाविद्यालयीन विद्यार्थिनीला एमएच ३० एएफ ५४४५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने धडक देऊन जखमी केले. १९ डिसेंबर रोजी गंभीर जखमी युवतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वडील चिंतामन वामनराव घोषे (५५, रा. भोईपुरा, परतवाडा) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी चालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा नोंदविला.
---------
परतवाड्यातून दुचाकी लंपास
परतवाडा : म्युनिसिपल हायस्कूलपुढील परेड ग्राऊंडवर ठेवलेली दुचाकी (एमएच २७ बीएस ६९१०) ७ डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी सलीम खान साहेब खान (३४) यांच्या तक्रारीवरून १९ डिसेंबर रोजी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.
---------------
टिप्परचालकास तिघांकडून मारहाण
दर्यापूर : मूर्तिजापूर ते दर्यापूर मार्गावर गायवाडी गावाकडून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी टिप्पर अडविल्यानंतर चालकाला खाली खेचले व छाती, डोके, चेहºयावर दगडांनी मारहाण केली. याप्रकरणी चालक अब्दुल सलीम अब्दुल कदीर (४९, रा. सुफी प्लॉट, दर्यापूर) यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलसिांनी भादंविचे कलम ३२५, ५०४, ५०६ अन्वये १९ डिसेंबर रोजी गुन्हा नोंदविला.
-----------
अवैध रेतीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
तिवसा : वर्धा नदीपात्रातील रेती वाहून नेणारा ट्रॅक्टर (एमएच २७एल ७३६५) व त्यासाठी रोड क्लीअरन्स करणारी कार (एमएच २७ एल ४५७८) मिर्चापूर तरोडा ते मार्डा मार्गाने तिवसा पोलिसांच्या गस्ती पथकाने १८ डिसेंबर रोजी गोपनीय माहितीवरून पकडली. याप्रकरणी चंदू गजानन ठाकरे (३०, रा. कौंडण्यपूर), सतीश बाबाराव चाफले (३३, रा. मार्डा), वैभव सुभाष कळंबे (२९, रा. उंबरखेड) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------
मुलांच्या भांडणातून महिलेला दुखापत
गुरुकुंज मोझरी : गुरुदेवनगर येथे १८ डिसेंबर रोजी मुलांच्या भांडणातून २३ वर्षीय विवाहितेला कल्पना मनोहर मिरासे हिने शिवीगाळ केली आणि मनोहर एकनाथ मिरासे याने दारूच्या नशेत ढकलले. त्यामुळे विवाहितेचे बोट फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी भादंविचे कलम ३२५, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
-----------------
जरूड येथे तरुणीला मारहाण
जरूड : येथील १८ वर्षीय तरुणीच्या डोक्यावर दाम्पत्याने वीट मारली. त्यांच्यापासून जीविताला धोका असल्याची तक्रार तिने वरूड पोलिसांत नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी भादंविचे शिल्पा भारत मसुले (३२) व भारत किसना मसुले (३८, दोन्ही रा. जरूड) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.
------------
खानापूर येथे घरफोडी
मोर्शी : तालुक्यातील खानापूर येथे १९ डिसेंबर रोजी सूरज प्रकाश ठाकरे (२४) या युवकाचे घर अज्ञात आरोपीने फोडले. अलमारीतील ५० हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. मोर्शी पोलिसांनी भादंविचे कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला.
-------------