स्त्री-जातीचा अपमान करणाऱ्या अपशब्दांवर कायदेशीर बंदी आणा, पत्रकार परिषदेत मागणी
By उज्वल भालेकर | Published: July 8, 2024 10:33 PM2024-07-08T22:33:18+5:302024-07-08T22:33:30+5:30
शिव्यामुक्त समाज अभियान समितीने आज अमरावतीत घेतली पत्र परिषद
उज्वल भालेकर, अमरावती: आपल्या देशात एकीकडे आपण मातृत्व दिन, रक्षाबंधन, भाऊबीज, महिला दिन साजरा करतो. तर दुसरीकडे त्याच आई आणि बहिणींशी निगडित स्त्रीजातीचा अपमान होईल अशा अपशब्दांचा व अश्लाघ्य शिव्यांचा वापरदेखील आपण करतो. भांडण पुरुषांचे असले तरी त्यामध्ये स्त्रियांचाच अपमान केला जातो. आपल्या आई, बहिणीच्या सन्मानासाठी अशा अपशब्दांवर कायदेशीर बंदी आणणे गरजेचे असल्याची मागणी शिव्यामुक्त समाज अभियान समितीच्या वतीने सोमवारी पत्र परिषदेत करण्यात आली. या बरोबरच शाळा, महाविद्यालयातून शिव्यामुक्त अभियान राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेदेखील यावेळी सांगण्यात आले.
आपल्या देश हा विविधतेने नटलेला अशा समृद्ध संस्कृतीची भूमी आहे. येथे सर्वच धर्म, संप्रदायात स्त्रियांचा आदर करण्याची मूल्ये सांगतात. स्त्रियांना देवीचे रूप देऊन त्यांची स्तुती तसेच पूजाही आपल्या देशात होते. परंतु दुसरीकडे पुरुषत्व दाखविण्यासाठी शिवीगाळ करताना मात्र त्यात स्त्रीजातीचा अपमान होईल असेच अश्लाघ्य शब्द वापरले जातात. आणि हे स्त्री आणि तिचे शरीर हे आपल्या मालकीचे आहे हे पुरुष मानसिकता दर्शवणारे आहे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीज व चित्रपटांमध्येदेखील अशा शिव्यांचा व अश्लील हिंसक दृश्यांचा सर्रासपणे वापर केला जात असून हे सामाजिक मूल्यांशी सुसंगत नाही. त्यामुळे यावर वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. त्यामुळे स्त्रियांच्यासंदर्भातील अश्लाघ्य शिवीगाळ थांबविण्यासाठी कठोर कायदा करणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये लिंगभाव समानता, माता-भगिनींचा सन्मान आदी बाबींचा समावेश करणे, ओटीटी प्लॅटफॉर्मवील चित्रपटात शिव्यांचा वापर करणाऱ्या लेखक. कलाकार, निर्देशक यांच्यावरही कारवाई व्हावी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून स्त्रीजातीचा अपमान करणार नाही अशा प्रकारचे प्रतिज्ञा पत्र लिहून घ्यावे अशा विविध मागण्या शिव्यामुक्त समाज अभियान समितीने केल्या आहेत. यावेळी डॉ. अंबादास मोहिते, पंडित पंडागळे, रजिया सुलतान, शीतल मेटकर, संजय देशमुख, भगवान फाळके आदी उपस्थित होते.