मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळले तपकिरी रंगाचे अस्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 04:35 PM2020-04-16T16:35:48+5:302020-04-16T16:36:35+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेºयात तपकिरी रंगाचे अस्वल कैद झाले आहे. ही देशातील बहुधा पहिलीच घटना आहे. या अस्वलाबद्दल सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागाच्या जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेºयात तपकिरी रंगाचे अस्वल कैद झाले आहे. ही देशातील बहुधा पहिलीच घटना आहे. या अस्वलाबद्दल सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळणारे अस्वल काळ्या रंगाचे असून फळे, मुंग्या आणि उधळी खाऊन भूक भागवितात. मात्र, व्याघ्र प्रकल्पातील सिपना भागात भारतीय वन्यजीव संस्थेने बसविलेल्या ट्रॅप कॅमेराने तपकिरी रंगाच्या अस्वलाची प्रतिमा कैद केली. ही दुर्मिळ घटना मानली जाते. देशातही ही पहिली घटना असू शकते. गुरुवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांनी या बाबीला दुजोरा दिला. ते म्हणाले, ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये त्वचेचे केस आणि इतर रंगांच्या प्रादुभार्वामुळे एखाद्या प्राण्यामध्ये रंगद्रव्य कमी निर्माण होतात.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात अनेक वर्षे तैनात वनसंरक्षक रवींद्र वानखडे म्हणाले, तपकिरी अस्वल मी मेळघाटात यापूर्वी पाहिले नव्हते. ही कदाचित या प्रकारची पहिली घटना आहे. यात अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाच्या जंगलात लावण्यात आलेल्या कॅमेरात एक तपकिरी रंगाचे अस्वल कैद झाले. ही एक अभूतपूर्व घटना आहे.
- एम.एस, रेड्डी, अप्पर प्रधान व मुख्य क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प