रिंगरोडवरील ढाब्यावर तरुणाची निर्घृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:44+5:302021-07-25T04:12:44+5:30
फोटो पी २४ रिंगरोड कॅप्शन : घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेसह घटनास्थळी भेट दिली. अमरावती : जेवणावरून झालेल्या वादातून ...
फोटो पी २४ रिंगरोड
कॅप्शन : घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी अधिनस्थ यंत्रणेसह घटनास्थळी भेट दिली.
अमरावती : जेवणावरून झालेल्या वादातून एका २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. रिंग रोडवरील एका ढाबा परिसरात २३ जुलै रोजी रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास ही घटना घडली. प्रसाद देशमुख (२७, पंजाबराव देशमुख कॉलनी, व्हीएमव्ही रोड) असे मृताचे नाव आहे. तर, या घटनेत समीर देशमुख ((५०, श्रीकृष्णपेठ) व दीपक आठवले (२८, महाजनपुरा) हे जखमी झालेत.
याप्रकरणी २४ जुलै रोजी आरोपी सिध्दांत गुलाबराव वानखडे (२३, पोटे टाऊनशिप) व संकेत गोवर्धन वानखडे (२२, शेगाव, अमरावती) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. समीर देशमुख यांनी याबाबत तक्रार नोंदविली.
तक्रारीनुसार, समीर देशमुख व प्रसाद देशमुख हे कठोरा रिंग रोडवरील एका ढाब्यावर शुक्रवारी रात्री जेवण करण्यास गेले. तेथे ढाब्याच्या आत आधीच दोघे होते. त्यावेळी त्या दोन आरोपींशी प्रसाद देशमुखचा वाद झाला. हा वाद वाढत असताना ढाबा संचालक बिरे यांनी मध्यस्थी केली. मात्र, आरोपींनी दाद न देता प्रसादच्या पायावर चायना चाकूने वार केला. वाद सोडविण्यास धजावलेल्या समीर देशमुख यांच्या हातावरदेखील वार करण्यात आला. वेटर दीपक आठवलेदेखील या हल्ल्यात जखमी झाले.
घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दुसरीकडे तिघा जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री लगेचच प्रसाद देशमुखचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर लगेचच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. शहरात दुपारी ४ वाजेपर्यंत हॉटेल, ढाबे सुरू ठेवण्याची परवानगी असताना रात्री १० ते ११ वाजेपर्यंत धाबे सुरू राहतात. तेथे भोजनही दिले जाते, ते कसे, हा प्रश्न यानिमित्ताने उपिस्थत झाला आहे.
बाॅक्स
ठाणेदार मुख्यालयाशी संलग्न
ढाब्याला दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी असताना ढाबा परिसरात जेवणाच्या वादातून खून झाल्याने नांदगाव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना तडकाफडकी पोलीस मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले. तर, बिट इंचार्ज असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन चाैखट यांना निलंबित करण्यात आले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी शनिवारी ही कारवाई केली. तेथील ठाणेदारपदाचा प्रभार गोरखनाथ गांगुर्डे यांच्याकडे देण्यात आला.
कोट
ढाबा परिसरात झालेल्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. तर, ठाणेदारांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले. बिट इंचार्ज असलेल्या एएसआयला निलंबित केले.
- आरती सिंह,
पोलीस आयुक्त