विद्यापीठाचे ७१.३२ कोटींच्या तुटीचे बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 09:47 PM2018-03-29T21:47:43+5:302018-03-29T21:47:43+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१८-२०१९ या वर्षाचा ७१.३२ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प अधिसभेत बुधवारी उशिरा सायंकाळी मंजूर केला.

The budget deficit of the University is Rs. 71.32 crores | विद्यापीठाचे ७१.३२ कोटींच्या तुटीचे बजेट

विद्यापीठाचे ७१.३२ कोटींच्या तुटीचे बजेट

Next
ठळक मुद्दे१०६.८४ कोटी उत्पन्नप्राप्तीचा अंदाज : प्रशासनाकडून विद्यार्थीकेंद्रित बजेट असल्याचा दावा

ऑनलाईन लोकमत
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने सन २०१८-२०१९ या वर्षाचा ७१.३२ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प अधिसभेत बुधवारी उशिरा सायंकाळी मंजूर केला. एकूण १७८.१६ कोटींचा अर्थसंकल्प असला तरी यात १०६.८४ कोटी उत्पन्नप्राप्तीचा अंदाज दर्शविला आहे. त्यामुळे खर्चापेक्षा उत्पन्नाचे साधने मर्यादित असल्याने ७१.३२ कोटींची तूट बजेटमध्ये कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे.
अधिसभा कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्र-कुलगुरु राजेश जयपूरकर व कुलसचिव अजय देशमुख पीठासीन होते. द्विदिवसीय अधिसभेच्या कामकाजादरम्यान विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झली. अधिसभेत अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी सादर केला, तर वार्षिक अहवाल व २०१६-२०१७ चे वार्षिक लेखे व अंकेक्षण अहवाल मनोज तायडे यांनी सादर केला.
प्राप्तीमध्ये परिरक्षण अंतर्गत वेतन व भत्ते यामध्ये अर्थसंकल्पीय वर्षात ५०.८४ कोटी, परीक्षा शुल्क ३६.३५ कोटी, शैक्षणिक विभाग २.५० कोटी, महाविद्यालयांकडून १.५८ कोटी शुल्कप्राप्ती, इतर प्राप्तीमध्ये ९.४० कोटी संकीर्ण प्राप्तीचा अंदाज वर्तविला आहे. विकास अनुदानांतर्गत २.१५ कोटी अनुदान हे यूजीसी केंद्र व राज्य शासनाद्वारे विकासकामांसाठी प्राप्त होईल. १.३८ कोटी स्वतंत्र प्रकल्प अथवा योजना आणि सहयोग कार्यक्रम अनुदानांतर्गत प्राप्तीचा अंदाज मांडण्यात आला. शोधन परिरक्षण अंतर्गत वेतन व भत्ते ५१.१३ कोटी, परीक्षा खर्च ३१.१६ कोटी, शैक्षणिक विभाग २.९६ कोटी, विद्यापीठ ग्रंथालय १.१४ कोटी, शारीरिक शिक्षण व रंजन मंडळ २.९० कोटी, इतर खर्च २८.४० कोटी खर्चाची तरतूद केली आहे. विकासांतर्गत ५५.४२ कोटी आणि स्वतंत्र प्रकल्प अथवा योजना, सहयोग अनुदानांतर्गत ३८.३८ लाख रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
ही आहेत अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
विद्यार्थिकेंद्रित उपक्रम व योजनांमध्ये ट्रेनिंग आणि इंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट - ५ लाख, स्कील डेव्हलपमेंट आणि ट्रेनिंग - ५ लाख, इनोव्हेशन आणि इन्क्यूबेशन - ५ लाख अशी एकूण १५ लाखांची तरतूद केली आहे. आर्थिक कमकुवत गटाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - ३० लाख, संत गाडगेबाबा एस.टी. बस पास योजना - ५ लाख, संत गाडगेबाबा विद्यार्थी शिक्षण संरक्षण योजना - ५ लाख आणि संत गाडगेबाबा शुद्ध पेयजल योजना - ८ लाख, संत गाडगेबाबा विद्याधन योजना - ५ लाख, बुलडाणा येथील आदर्श पदवी महाविद्यालयात आवर्ती खर्च - ४४.२२ लाख तर अनावर्ती खर्च - ३८.५६ लाख, विद्यार्थी सुरक्षा विमा अंतर्गत २७.५० लाख, आविष्कार अंतर्गत संशोधन - ९ लाख, संशोधक तसेच विद्यार्थ्यांना अत्यावश्यक ग्रंथालयीन सुविधा - २ कोटी ३ लाख ३४ हजार रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी योजनांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी प्रशिक्षण आणि गृहकर्ज - ५ कोटी, विद्यापीठाने कर्मचाऱ्यांना वाहनासाठी तरतूद, शारीरिक शिक्षकांसाठी दैनिक भत्ता ५०० रुपये वाढविणे तसेच शैक्षणिक विकास उपक्रमाकरिता ५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यावर्षीपासून कुलगुरू शैक्षणिक उत्कृष्टता अवॉर्ड सुरू केला जाणार आहे. याशिवाय ट्रेनिंग फॉर टीचर्सकरिता २.१० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठ परिक्षेत्रांतील पाचही जिल्ह्यांमध्ये उपकेंद्र (निर्माणाधीन) करिता २५ लाख, स्थायी दीक्षांत मंडप उभारणे - १ कोटी, विद्यापीठाच्या परिसरातील विद्यमान बगीचाचे नूतनीकरण - ९० लाख, डिजिटल युनिव्हर्सिटीसाठी आय.सी.टी. प्रकल्पांतर्गत ७५ लाख, कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आणि रिसोर्स जनरेशन फंड अंतर्गत २ लाख, आपत्कालीन निधीमध्ये विविध कार्यक्रम/शिबिर आयोजन - ३० लाख, सोशल कनेक्ट अंतर्गत ३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
अतिकेंद्रित योजनांमध्ये दूरस्थ शिक्षण उपक्रम - २३ लाख, अ‍ॅकेडमिक डिझिटायझेशन - १० लाख, स्वच्छ भारत - स्वस्थ भारत योजनेंतर्गत १.६४ लाख, बेस्ट प्रॅक्टिसेस इन युनिव्हर्सिटी अंतर्गत विविध उपक्रम - ६ कोटी ७७ लाख ५५ हजार, इक्वल अपॉर्च्युनिटी सेल - ३ लाख, माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विविध विकास योजनांमध्ये सहभाग - १० लाख, विशेष तरतुदीअंतर्गत कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव व विद्याशाखा अधिष्ठात्यांसाठी नवीन प्रशासकीय इमारतींकरिता १० कोटी, रासायनिक तंत्रशास्त्र विभागाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाकरिता ५ लाख, विद्यापीठाद्वारे डायट कौन्सिलिंग सेंटर अंतर्गत ५० हजारांची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: The budget deficit of the University is Rs. 71.32 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.