महापालिकेचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीसमोर
By admin | Published: March 21, 2016 12:14 AM2016-03-21T00:14:22+5:302016-03-21T00:14:22+5:30
महापालिकेचा सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचा प्रारूप आराखडा सोमवार २१ मार्चला स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे.
मार्डीकरांसमोर आव्हान : नवे कर नाहीत
अमरावती : महापालिकेचा सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचा प्रारूप आराखडा सोमवार २१ मार्चला स्थायी समितीसमोर मांडला जाणार आहे. स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर हे अन्य सदस्यांसह या अर्थ संकल्पावर खल करणार आहेत.
महापालिका आयुक्तांनी यंदाचा अर्थ संकल्प सुमारे ८०० कोटी रुपयांचा असल्याचे संकेत दिले आहे. काही सुधारणा सुचविण्यासाठी आयुक्तांकडून आलेला आराखडा स्थायी समितीसमोर मांडल्या जातो. स्थायी समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर तो आमसभेत ठेवल्या जातो. महापालिकेचे मर्यादित आर्थिक स्त्रोत पाहता वस्तुनिष्ठ अर्थ संकल्प सादर करण्याचे प्रशासन आणि स्थायी समितीसमोर आव्हान आहे. सुमारे ७ लाख लोकसंख्येच्या अमरावती शहराला अद्यापही मुलभुत सुविधाची गरज आहे. त्या पुर्ण करण्याकडे पालिकेचा भर असायला हवा, ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन मर्यादित उत्पन्नामध्ये आणि कुठलीही करवाढ न करता आर्थिक ताळेबंद जुळविण्याचे प्रयत्न यंत्रणेला करावयाचा आहे. स्थानिक संस्था कर प्रणाली अस्तिवात नसल्याने महापालिकेचे उत्पन्न मर्यादित झाल्याने पालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना नवे आर्थिक स्त्रोत शोधण्याचे धनुष्य पालिकेच्या यंत्रणेसह नगरसेवक पदाधिकाऱ्यांनाही पेलावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
वस्तुनिष्ठतेवर भर-मार्डीकर
महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प सादर केला जाईल, मर्यादित उत्पन्नावर शहराला कशी दिशा देता येईल, यावर भर दिला जाणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने नगरसेवकांना लवकरात लवकर निधी देण्याकडे स्थायी समितीचा कल आहे. उत्पन्न वाढीसाठी नागरिकांना विश्वासात घेऊन प्रयत्न करणार आहोत, रस्ते, नाल्या, पेयजल, पार्किंग या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्नरत आहोत, अशी प्रतिक्रीया स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर यांनी दिली.