बजेटमध्ये ११० कोटींच्या कर्जाची रक्कम गळणार
By admin | Published: February 17, 2016 12:02 AM2016-02-17T00:02:51+5:302016-02-17T00:02:51+5:30
महापालिका प्रशासनामार्फत चालू वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास वेगाने सुरूवात झाली आहे.
महापालिका आयुक्तांचे संकेत : विभागप्रमुखांची बैठक, खर्चाला बसणार ब्रेक
अमरावती : महापालिका प्रशासनामार्फत चालू वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास वेगाने सुरूवात झाली आहे. दरवर्षी कर्जाची रक्कम नमूद करुन बजेट फुगवून सादर केले जाते. मात्र, यावर्षी बजेटमधून ११० कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम गळण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. अर्थसंकल्प वस्तुनिष्ठ असावा, यासाठी सोमवारी विभाग प्रमुखांची बैठक पार पडली.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या दालनानजीकच्या कक्षात पार पडलेल्या या बैठकीला उपायुक्त विनायक औगड, चंदन पाटील, नगरसचिव मदन तांबेकर, सहायक संचालक नगर रचना विभाग सुरेंद्र कांबळे, पर्यावरण अधिकारी देशमुख, लेखापरीक्षक प्रेमदास राठोड, अतिरिक्त शहर अभियंता जीवन सदार, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, प्रणाली भोंगे, योेगेश पिठे, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त गुडेवार यांनी विभागनिहाय आढावा घेताना खर्च आणि उत्पन्नाची बाजू तपासली. महापालिकेत उत्पन्नाच्या बाजू तोकड्या असल्यामुळे खर्चावर अंकुश लावण्याबाबत मंथन देखील करण्यात आले. बजेटमध्ये तरतूद असलेल्या अनावश्यक खर्चावर ‘ब्रेक’ लावण्याच्या मानसिकतेत आयुक्त पोहोचले आहेत. महसुली आकडेवारीला प्राधान्य देत वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प सादर करण्यावर भर दिला जाईल, असे या बैठकीतून स्पष्ट करण्यात आले. आस्थापना खर्चाची आक डेवारी जाणून घेताना आयुक्त गुडेवार यांनी नगरसेवक निधीला प्राधान्य देण्याविषयी मंथन केले. वेतन खर्चात कशी कपात करता येईल, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बुधवारी १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या विशेष उपस्थितीत विभाग प्रमुखांची या मुद्यावर बैठक घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)