म्हशीची शिकार, वाघ परिसरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:03 AM2018-10-22T01:03:41+5:302018-10-22T01:04:07+5:30
मोहन राऊत। लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : ८१ वेळा दात व पंजाने मारा करून शेतकरी राजेंद्र देवीदास निमकर ...
मोहन राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : ८१ वेळा दात व पंजाने मारा करून शेतकरी राजेंद्र देवीदास निमकर (४५) यांना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाने दुसऱ्या दिवशी म्हशीची शिकार केली़ वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे़ दरम्यान, दोन दिवसांपासून परिसरात या वाघाचा मुक्काम असून, अंजनसिंगी, कौंडण्यपूर भागातील २२ गावे अलर्ट करण्यात आली आहेत.
अनेक गावे रात्रीला या नरभक्षक वाघाच्या दहशतीत आहे़ शनिवारच्या रात्रीला गावाच्या परिसरात शिरला असल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थ टेंभे घेऊन घराबाहेर पडले. झाडा, आष्टा, गिरोली, चिंचोली, येरली, सोनोरा काकडे, गोकुळसरा या गावातील लोकांनी रात्र जागूून काढली असली तरी एकाच ठिकाणी या वाघाचा मुक्काम असल्याचे स्पष्ट झाले आहे़
मृत राजेंद्र निमकर यांना या ठिकाणी वाघाने ठार केले, त्या भागात वनविभागाच्यावतीने म्हैस खरेदी करून बांधण्यात आली होती़ रात्री १२ ते ३ च्या दरम्यान या नरभक्षक वाघाने म्हशीवर हल्ला चढविला. मानेवर हल्ला चढवून ही म्हैस त्याने फस्त केली. त्याच्या हालचाली वनविभागाने लावलेल्या तीन सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. मोर्शी, वरूड, परतवाडा, अमरावती येथील ३१ बंदूकधारी कर्मचारी मागावर असली तरी प्रथमच मिळालेली माणसाची शिकार करीत दिघी खानापूर व नाकाडाच्या घनदाट जंगलात या वाघाने दोन दिवसांपासून मुक्काम ठोकला असल्याचे स्पष्ट झाले आहे़
शेतात ओलीत करण्यासाठी विहिरीजवळील लाइट लावताना पाठीमागून या नरभक्षक वाघाने हल्ला चढविला. तब्बल १० मिनिटे राजेंद्र निमकर यांनी जीव वाचविण्यासाठी धडपड केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. घटनास्थळावर कपाशीची झाडे उखडली तसेच जमीन उकरण्याच्या अनेक खुणा वनविभागाने केलेल्या पंचनामा अहवालात नमूद आहेत.
एखादा शेतकरी, शेतमजूर वाघाच्या हल्यात ठार झाल्यास पूर्वी आठ लाखांची नगदी मदत मिळत असे़ सन २०१५ च्या शासकीय अध्यादेशाप्रमाणे दहा लाखांची मदत वनविभागाने जाहीर केली. केवळ दोन लाख रुपये रोख, तर आठ लाखांचा दहा वर्षांसाठी बॉण्ड केला जातो. किमान घरातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेणे महत्त्वाचे आहे़ दोन दिवसांपासून निमकर कुटुंबाला वनविभागाने मदत न दिल्याने असंतोष व्यक्त होत आहे़
मंगरुळ दस्तगीर शिवारातील नरभक्षक वाघ ट्रॅप कॅमेºयात कैद झाला आहे. त्याचे परिसरातील जंगलातच वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग तातडीने उपाययोजना करीत आहे.
- हरिश्चंद्र वाघमोडे, उपवनसंरक्षक, अमरावती
चिरोडी जंगलाकडे होणार प्रस्थान :२२ गावे अलर्ट
वरोरा जंगलातून देवळी, पुलगाव व थेट अमरावती जिल्ह्यात प्रवेश करणारा हा नरभक्षक वाघ दररोज रात्रीच्या सुमारास १८ ते २० किलोमीटर प्रवास करीत असल्याची माहिती वनविभागाजवळ आहे़ मंगरूळ दस्तगीर येथे मानवाची शिकार मिळाल्याने या वाघाने मुक्काम ठोकला. आगामी दिवसांत नायगाव, वरूड बगाजी, अंजनसिंगी, कौंडण्यपूर, कुºहा, भिवापूर मार्गे चिरोडी, पोहरा जंगलात या वाघाचे प्रस्थान होण्याचे संकेत मिळाल्याने वनविभागाने २२ गावे अलर्र्ट केली असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर व वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी दिली़
पिंजऱ्याची परवानगी मिळणार कधी?
नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी तथा पिंजऱ्यात अडकविण्याकरिता नागपूरच्या प्रधान मुख्य वाघ्र प्रकल्पाची परवानगी गरजेची असते़ अमरावतीचे उपवनसरंक्षक हरिचंद्र वाघमोडे यांनी शनिवारी यासंदर्भात पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षक एक़े. मिश्रा यांंना पाठविण्यात आले. सदर नरभक्षक वाघ एकाच ठिकाणी दोन दिवस मुक्कामी असताना अद्यापही पिंजºयाची परवानगी मिळाली नाही़