झेडपी शिक्षकांच्या वर्गणीतून कोविड सेंटर उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:12 AM2021-05-06T04:12:54+5:302021-05-06T04:12:54+5:30
अमरावती : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वर्गणीतून ...
अमरावती : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वर्गणीतून कोविड सेंटर उभारण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्ताव अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आपल्या सहृदयतेचा परिचय देत अनेकदा दुर्धर व्याधीत अडकलेल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व प्रसंगी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठीसुध्दा वर्गणी गोळा करून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या परिस्थितीत कोविड-१९ च्या उपचारासाठी रुग्णालयांची व बेडची कमतरता आहे. यापुढे देखील तिसरी व चौथी लाट येण्याचे भाकीत तज्ज्ञानी वर्तविले आहे. यासर्व परिस्थितीचा विचार करून जिल्ह्यातील अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सदस्यांनी कोविड केअर सेंटरसाठी वर्गणी करून सेंटर उभारण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सीईओंकडे या संघटनेने मार्च २०२१ च्या वेतनापासून प्रतिशिक्षक १ हजार रुपयाप्रमाणे रक्कम कपात करून विशिष्ट खात्यावर जमा करून अमरावती, अचलपूर असे दोन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे, तसेच ही मदत प्राथमिक असून यापेक्षाही अधिक मदत काही शिक्षक बंधू भगिनी देऊ शकतात, असा विश्र्वासही या संघटनेने निवेदनातून व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर विविध शिक्षक संघटनांची सभा बोलवून याबाबत निर्णय घेण्याची मागणी सीईओंकडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस किरण पाटील व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.