अमरावती येथील इमारत कोसळली, पाच ठार, एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 06:17 AM2022-10-31T06:17:35+5:302022-10-31T06:17:53+5:30
सपोर्ट देणारे छत कोसळले
अमरावती : येथील प्रभात चौकातील राजेंद्र लॉजच्या दुमजली इमारतीचे छत कोसळून तळमजल्यावरील दुकानाच्या व्यवस्थापकासह चार मजुरांचा दबून मृत्यू झाला. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास व्यवस्थापकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर मदतकार्य अविरत सुरू होते.
मलब्याखाली दबलेले चार मृतदेह एनडीआरएफच्या चमूने बाहेर काढले. रवी परमार (४२, साईनगर), असे मृत व्यवस्थापकाचे नाव आहे, तर मो. कमर ऊर्फ कम्मू इक्बाल मो. रफिक (३५, रहमतनगर), मो. आरीफ शेख रहीम (३५, रा. रहमतनगर) व रिजवान शाह शरीफ शेख (२०, उस्माननगर, लालखडी), अशी मृतांची नावे आहेत.
टेकू द्यायला गेले अन्...
राजदीप एम्पोरियमचे व्यवस्थापक रवी परमार हे रविवारी पहाटे मुंबईहून अमरावतीला परतले. मजुरांसह त्यांनी सकाळी राजदीप एम्पोरियमच्या डागडुजीस सुरुवात केली. वरच्या राजेंद्र लॉजचे छत कोसळू नये म्हणून सपोर्ट देण्याचे काम सुरू होते.
राजेंद्र लॉजसह त्या इमारतीतील एकूण सहाही दुकानांना नोटीस दिल्या होत्या. पैकी लॉजच्या पहिल्या मजल्यावरील बांधकाम पाडण्यात आले, तर पाच दुकानांनी त्वरित डागडुजी करून घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ती करताना पुरेशी सजगता बाळगली गेली नसल्याचे सकृत्दर्शनी दिसून आले. - सुहास चव्हाण, उपअभियंता, राजापेठ झोन, महापालिका