उद्यान विकासात ‘बांधकामा’चा घोळ
By admin | Published: April 10, 2016 12:02 AM2016-04-10T00:02:59+5:302016-04-10T00:02:59+5:30
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात उद्यान विकासाची कामे हाती घेण्यात आली व यातच लक्षावधींचा घोळ घालण्यात आला.
कार्यकारी अभियंत्यावर ठपका : प्रशासकीय कारवाईची शिफारस
प्रदीप भाकरे अमरावती
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात उद्यान विकासाची कामे हाती घेण्यात आली व यातच लक्षावधींचा घोळ घालण्यात आला. या कामादरम्यान महापालिकेच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांवरही अनियमिततेचा ठपका आहे. त्यामुळे २.३० कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारामध्ये फौजदारीची टांगती तलावर असणाऱ्यांच्या संस्थेत भर पडू लागली आहे.
उद्यान विकासकामात ६० टक्क्यांपेक्षा अधिक खर्च साहित्यावर करण्यात आला. महापालिका आयुक्तांनी साहित्य व मजुरी खर्च ६०.४० या प्रमाणाला मान्यता दिली होती. मात्र प्रत्यक्षात साहित्यावर १८ लाख ७८ हजार ६३९ रुपये अधिकचे खर्च करण्यात आले. या गैरव्यवहारात संबंधित जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.
तांत्रिक मंजुरी न घेता कामे
उद्यान विकासाच्या कामावर २०१२-१३ ते डिसेंबर २०१५ पर्यंत झालेल्या १४ कामांमध्ये प्रचंड अनियमितता झाली. या १४ कामांचे इस्टिमेट व मोजमान पुस्तिकेतील मोजमापे व मूल्यांकनात १० टक्क्यांपेक्षा अधिक व काही बाबींवर १०० टक्क्यांपेक्षा अधिक साहित्याचा वापर दाखवून १०० पट रक्कम संबंधित कंत्राटदाराला देण्यात आली. नवसारी येथील शिवार्पण कॉलनी उद्यानात इस्टिमेटमध्ये मातीचे परीक्षण १०.८० घनमीटर आहे, तर मोजमापाप्रमाणे १०७८.७३ घनमीटर आहे. यात ४४ हजारांचा घोळ घालण्यात आला. अन्य उद्यानाच्या कामात फार मोठी रक्कम साहित्याच्या बाबीवर प्रदान करण्यात आली. ही रक्कम देण्यापूर्वी सुधारित तांत्रिक मंजुरी देणे आवश्यक होते. मंजुरी न घेतल्याने ९ लाख ३८ हजार ३९५ रुपयांचा खर्च नियमबाह्य ठरला आहे.
पुरवठा अवास्तव दाखवून
१४.५४ लाखांचा घोळ
मोजमाप पुस्तिकेत मोजमापे नमूद करून येणारे परिमाण याप्रमाणे देयके न देता वेगवेगळे साहित्य व त्याचे दर विचारात घेऊन १४ लाख ५४ हजार ९९० रुपये अधिक प्रदान करण्यात आले. सिमेंट, रेती, मिक्सर, भाडे व इंधन खर्चावर अवास्तव खर्च करण्यात आला. प्रोव्हायडिंग १२ एमएफ थीक प्लॅस्टरसाठी सिमेंट अल्प प्रमाणात दाखविलेल्या वेळी रेती पुरवठा मात्र अवास्तव झाल्याने येथे घोळ घालण्यात आला.
उपअभियंत्यावर कारवाई ?
या भ्रष्टाचार प्रकरणात उपअभियंत्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या कामावर अवास्तव खर्च होत असताना त्यांनी कंत्राटदारांच्या देयकाचे व मोजमाप पुस्तिकेतील मोजमापाची १०० टक्के तपासणी केली. त्यावर लेखापरीक्षण अहवालात ठपका ठेवला आहे. या कामांची तपासणी अधीक्षक अभियंता दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून करून घेण्याची सूचना आहे.