बुलडाणा संघ प्रथमच राज्यस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:13 AM2017-09-17T00:13:27+5:302017-09-17T00:13:52+5:30
येथील पोलीस मुख्यालयाच्या क्रिडांगणावर शनिवारी झालेल्या अमरावती विभागीय नेहरू कप हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिर बुलडाणा संघाने गत पाच वर्षांपासून विभागीय स्पर्धेतील विजेता.......
नीलेश भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील पोलीस मुख्यालयाच्या क्रिडांगणावर शनिवारी झालेल्या अमरावती विभागीय नेहरू कप हॉकी स्पर्धेत सहकार विद्या मंदिर बुलडाणा संघाने गत पाच वर्षांपासून विभागीय स्पर्धेतील विजेता अमरावती संघाचा तीन विरुद्ध शून्य गोलने दणदणीत पराभव करून प्रथमच राज्यस्तरावर दिमाखात प्रवेश केला.
क्रीडा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळ यांच्यावतीने व पोलीस मुख्यालय यांच्या सहकार्याने १६ व १७ सप्टेंबरपर्यंत या स्पर्धा घेण्यात आल्या. शनिवारी १५ वर्षाआतील नेहरू कप हॉकी स्पर्धा घेण्यात आली. यात अमरावती, अकोला, बुलडाणा व यवतमाळ असे चार संघ सहभागी झाले होते. दुपारी ३.३० वाजता अमरावती विरुद्ध बुलडाणा संघादरम्यान अंतिम सामना झाला. अमरावती संघाने आक्रमक सुरुवात केली. मात्र बुलडाणा संघानेही तुल्यबळ लढत दिल्याने सामना रंगतदार झाला. सामन्याच्या १६ व्या मिनिटाला बुलडाणाच्या नयन ढोणे याने रिव्हर्स शॉटने सुरेख गोल करीत संघाला १-० गोलची आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर बुलडाणा संघाला मिळालेल्या पेनॉल्टी कॉर्नरवर परत नयननेच लागोपाठ दुसरा गोल करीत अमरावती संघाला दबावात आणले. सामना संपण्याच्या आठ मिनिटापूर्वी अमरावती संघाच्या अनसने गोल अंतर करून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र बुलडाणा संघाने गोल करण्याची लय कायम ठेवत शेवटच्या मिनिटात तिसरा गोल केला. विजय क्षीरसागरने हा विजयी गोल करीत बुलडाणा संघाला तीन विरुद्ध एक गोलने दिमाखदार विजय मिळवून देत राज्यस्तरावर प्रवेश निश्चित केला.
तत्पूर्वी अमरावती संघाने अकोला संघाचा तीन विरुद्ध एक गोलने तर बुलडाणा संघाने यवतमाळ संघाचा एक-शून्य गोलने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. स्पर्धेचे पंच म्हणून नागपूरचे प्रमोद जैन, पंकज वाघधरे, सुशील बागडे, धनंजय शेखदार, संतोष वट्टी यांनी काम पाहिले. स्पर्धा संयोजक म्हणून क्रीडा अधिकारी राहुल कपाळकर यांनी जबाबदारी सांभाळली.
नागपूरचे पंच
जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी व शालेय स्पर्धेच्या आयोजनात पाचही सामन्यात वाद व पंचावर आक्षेप घेण्यात आल्याने जिल्हा क्रीडा कार्यालयाने विभागीय स्पर्धेचे आयोजन स्थानिक हॉकी संघटनेचे सहकार्य न घेता स्वत: करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी येथील पोलीस मुख्यालयाला विभागीय हॉकी स्पर्धेसाठी क्रिडांगण व पंच उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच तटस्थ पंच म्हणून विदर्भ हॉकी संघटना नागपूरकडे पंचाची मागणी केली, हे विशेष.