बुलढाणा, अकोल्यातून येऊन अमरावतीत दुचाकी चोरी; दोन आरोपी अटकेत
By प्रदीप भाकरे | Published: August 25, 2023 03:57 PM2023-08-25T15:57:44+5:302023-08-25T15:59:14+5:30
आरोपींवर गुजरात, तेलंगणात गुन्हे दाखल
अमरावती : बुलढाणा व अकोल्यातून अमरावतीत येत दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत चोरांना राजापेठ पोलिसांनी अटक केली. गुरूवारी उशिरा रात्री करण्यात आलेल्या या कारवाईमधील दोन्ही अटक आरोपींविरूध्द तेलंगण व गुजरात राज्यामध्ये देखील विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे. विजय बाळु मोहीते (१९, टाकरखेड, ता. चिखली, बुलढाणा), व जितेंद्र मन्साराम चव्हाण (२८, रा. उमरा, ता. आकोट, अकोला) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
भटवाडी, शिवाजीनगर भागात राहणाऱ्या अमन दिलीप गोलाईतकर (२१) याची दुचाकी त्याच्या घरासमोरून चोरीला गेली होती. त्याच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना राजापेठचे डीबी पथकाच्या हाती दोन्ही आरोपींची माहिती आली. २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी भटवाडी येथील दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून गोलाईतकर याच्या दुचाकीसह अन्य एक दुचाकी असा १.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्या गुन्हयात त्यांना गुरूवारी रात्री ११.३४ वाजता अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडीदरम्यान त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
यांनी केली कार्यवाही
ही कारवाई पोलीस आयुक्त नविनचंद्र रेडडी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठच्या ठाणेदार सिमा दाताळकर, पोलीस निरीक्षक पुनीत कुलट, उपनिरिक्षक गजानन काठेवाडे, अंमलदार मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज खटे, विजय राउत, नापोकों गनराज राऊत व सागर भजगवरे यांनी केली.