साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीने दुमदुमले वरूड
By admin | Published: November 30, 2015 12:33 AM2015-11-30T00:33:54+5:302015-11-30T00:33:54+5:30
शिक्षण आणि परिवर्तननिष्ठा ही मानवाच्या परिवर्तनाची महाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानली तर शिक्षणावाचून माणूस गुलाम होतो.
नामवंत साहित्यिकांची मांदियाळी : भांडवलदार, राजकारणी, धर्मांधशक्तीची अभद्र युती
वरूड : शिक्षण आणि परिवर्तननिष्ठा ही मानवाच्या परिवर्तनाची महाव्दारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानली तर शिक्षणावाचून माणूस गुलाम होतो. हे त्यांचे विचारसूत्र होते. अविद्या हे सर्व अनर्थाचे मूळ आहे. असे महात्मा जोतिबा फुले आवर्जून सांगत होते. ज्ञानानेच आत्मस्थिती व समाजस्थिती येते हे या गुरू-शिष्याने निक्षून सांगितले आहे. बदलत्या काळात भांडवलदार, राजकारणी आणि धर्मांधशक्ती यांची अभद्र युती झालेली दिसते. समाजमन गढूळ झाले आहे.
जाती जाती, धर्माधर्मात विष पेरल्या जात आहे. हाच खरा लोकशाहीला धोका निर्माण झाला असल्याने बदलत्या काळात हे चित्र बदलण्याची देशाला गरज असल्याने सत्यशोधक विचारांची गरज असल्याने शनिवारी वरुडमध्ये सहावे सत्यशोधक साहित्य संमेलन सुरु झाले. या निमीत्ताने शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.
साहित्य समेंलन काठीवाले सभागृहात सुरू आहे. या परिसराला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले परिसर असे नाव देण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी काढण्यात आली. स्थानिक महात्मा फुले पुतळयाला हारार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सामाजिक चळवळीतील सेवाभावी संस्था, प्रतिष्ठीत नागरिक तसेच आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते हारार्पण करण्यात येऊन ग्रांथदिंडीला सुरुवात झाली. काठीवाले सभागृहात आयोजित साहित्य संमेलनाचे उदघाटन आ. अनिल बोंडे यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी प्रख्यात विचारवंत भाऊ लोखंडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, संत गाडेगाबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुधीर पाटील, जि.प.बांधकाम सभापती गिरीष कराळे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, श्रीकृष्ण बनसोड, महात्मा फुले महादिव्यालयाचे प्राचार्य देवानंद अतकरे, माजी पोलीस उपायुक्त धनराज वंजारी, शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्षा सरिता खेरडे, ठाणेदार अर्जुन ठोसरे, आयोजन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कळमकर, वासुदेव लांडगे, साहित्यिक ज्ञानेश्वर रक्षक उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष स्त्रीरोगतज्ज्ञ मनोहर आंडे यांनी सन्मानचिन्ह आणि पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.
संमेलनाचे उद्घाटक आ. अनिल बोंडे यांनी भाऊसाहेब लोखंडे यांना हे संमेलन आहे राजकीय स्टेज नसलेल्यांचे, असे सांगून शाब्दिक बोलाचाल झाली. यावेळी विषयाला कलाटणी देत भाउसाहेब लोखंडे यांनी विषय सावरुन नेला. यांनी वरुडमध्ये पहिल्यांदा ६ वे सत्यशोधक साहित्य संमेलन होत असून अनेकांना संमेलनाची आतुरता लागली आहे. नामवंत साहित्यिक, विचारवंत शहरामध्ये दाखल झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)