तेलरंगांमुळे बैलांच्या शिंगांना कर्करोगाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:48 PM2019-08-18T13:48:55+5:302019-08-18T13:49:39+5:30
बैलांच्या शिंगांना तेलरंग लावल्यामुळे त्यातील विषारी घटक शिंगात शोषले जातात. त्यामुळे शिंगांमध्ये जळजळ होऊन कर्करोग होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बैलांना शिंगाच्या कर्करोगाचा धोका बळावत आहे. यामध्ये ५ ते १० वर्षे वयोगटातील जनावरांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत आहे. खच्ची केलेल्या तसेच शेती कामातील बैलांमध्ये हे प्रमाण गाईपेक्षा अधिक आहे. लक्षणे ओळखून तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्तांचे म्हणणे आहे.
जनावरांची शिंगे ही संरक्षणासोबत शरीराची शोभा वाढवतात. म्हणून शिंगांची निगा राखणे महत्त्वाचे असते. शिंगांमध्ये जळजळ होत असल्याने बैल इतरत्र शिंग घासत असल्याने इजा होऊन चार टप्प्यांत कर्करोगाची लक्षणे आढळतात. लक्षणे दिसताच त्याची पशू वैद्यकांकडून योग्य तपासणीअंती करवून घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. जिल्हा सर्व चिकित्सालयात अशी लक्षणे अनेक गुरांमध्ये आढळल्याचेही डॉ. गोहत्रे म्हणाले.
दुसऱ्या टप्प्यातील लक्षणे
शिंगे हळूहळू खाली झुकतात. शिंगांच्या बुडाला जखम होते. जखमेतून रक्त, पू निघते व घाण वास येतो. कर्करोग झालेल्या शिंगास मारून पाहिल्यास आवाजातील फरक जाणवतो.
तिसऱ्या टप्पातील लक्षणे
शिंग पूर्णत: एका बाजूस झुकते. आपोआप तुटून पडते. शिंगाच्या बुडाला जखमेची वाढ झालेली दिसते. अशक्तपणा, तणाव येतो. भूक मंदावते.
कर्करोगाची कारणे
शिंगांना तेलरंग लावल्यामुळे त्यातील विषारी घटक शिंगात शोषले जातात. त्यामुळे शिंगांमध्ये जळजळ होऊन कर्करोग होतो. शिंगे सोलणे किंवा घासणे, शिंगाला सतत इजा होणे, उन्हात काम करीत असताना सूर्याच्या अतिनील किरणांमुळे कर्करोग होतो. शेतात काम करीत असताना सतत शिंगाला जू घासणे, शिंगांना सतत दोर बांधून ठेवल्याने कर्करोगाची शक्यता बळावते.
कर्करोग कसा ओळखावा?
पहिल्या टप्प्यातील लक्षणे
टणक, कडक जागेवर शिंग घासणे. असमान शिंगे. कर्करोग झालेल्या बाजूच्या नाकपुडीतून रक्तमिश्रित स्राव. शिंगाचे बुड मऊ, गरम होते. शिंगाला वेदना होतात.
बैलांवर असे करावे उपचार
लक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. शस्त्रक्रिया करून कर्करोगबाधित शिंग बुडापासून काढून टाकावे. कर्करोगविरोधी औषधांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा. शिंगे सोलू किंवा घासू नये. विषारी घटक असलेला रंग लावू नये. कडक उन्हात बैलांपासून अधिक वेळ काम करून घेऊ नये. शिंगाला सतत इजा होणाºया गोष्टींना प्रतिबंध करावा. जूवर आवरण घालावे. शिंगांवर सतत मारणे अथवा टोचणे बंद करावे. वेळोवेळी पशुवैद्यकांचे मार्गदर्शन घ्यावे.
शिंगाच्या कर्करोगाचे निदान जिल्ह्यात झाले आहे. शेतकऱ्यांनी याबाबत काही लक्षणे आढळल्यास दिरंगाई न करता पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ न्यायला हवे.
- मोहन गोहत्रे, पशुसंवर्धन उपायुक्त