दलालविरहीत बैलबाजार, फिरस्ती बाजारात जनावरांना मिळतोय 'लाख' मोलाचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 02:44 PM2019-03-23T14:44:34+5:302019-03-23T15:09:12+5:30

लक्षवेधक ठरलेल्या या बैलबाजारात ३५ ते ४० हजारांपासून बैलजोड्या तसेच लाख-दीड लाखांचा बैल उपलब्ध आहे. परतवाडा-अमरावती रोडवर अचलपूर नाक्यालगत खुल्या शेतात आठ ते दहा दिवसांपासून बैल विक्रीस उपलब्ध आहेत.

bull market in amravati many pepole visit | दलालविरहीत बैलबाजार, फिरस्ती बाजारात जनावरांना मिळतोय 'लाख' मोलाचा भाव

दलालविरहीत बैलबाजार, फिरस्ती बाजारात जनावरांना मिळतोय 'लाख' मोलाचा भाव

googlenewsNext
ठळक मुद्देलक्षवेधक ठरलेल्या या बैलबाजारात ३५ ते ४० हजारांपासून बैलजोड्या तसेच लाख-दीड लाखांचा बैल उपलब्ध आहे.परतवाडा-अमरावती रोडवर अचलपूर नाक्यालगत खुल्या शेतात आठ ते दहा दिवसांपासून बैल विक्रीस उपलब्ध आहेत. दलालविरहित या बैलबाजारात व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) - स्थानिक बाजाराबाहेरील बैलबाजारात ‘लाखाचा बैल’ विक्रीस उपलब्ध आहे. नागौर जातीचे हे बैल आहेत. दीडशे ते दोनशे बैल याठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असून, यात चार व सहा दाती बैल आहेत. लक्षवेधक ठरलेल्या या बैलबाजारात ३५ ते ४० हजारांपासून बैलजोड्या तसेच लाख-दीड लाखांचा बैल उपलब्ध आहे.

परतवाडा-अमरावती रोडवर अचलपूर नाक्यालगत खुल्या शेतात आठ ते दहा दिवसांपासून बैल विक्रीस उपलब्ध आहेत. पहिल्यांदाच हा खुला बैलबाजार भरला आहे. दलालविरहित या बैलबाजारात व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. मूळचे राजस्थानमधील आणि मध्य प्रदेशात वास्तव्यास असलेल्या, नेहमी भटकंतीवर राहणाऱ्या गडिया लोहार समाजातील कुटुंबांनी हे बैल विक्रीस आणले आहेत. मध्यप्रदेशातील विजयपूर येथील पशुमेळाव्यातून त्यांनी हे नागोर बैल खरेदी केले. परतवाडा आणि चांदूरबाजार येथील बैलबाजार प्रसिद्ध असतानाही बाजाराबाहेरील या बैलबाजारात बैलांची आणि शेतकऱ्यांची गर्दी बघायला मिळत आहे.

कुटुंबातील एका सदस्याचे मध्य प्रदेशात निधन झाल्यामुळे जिल्हाभर विखुरलेली गडिया लोहाराची ही २५ ते ३० कुटुंबे आपल्या बैलगाडी व बैलांसह अचलपूर नाक्यावर एकत्र आलीत अन् यातूनच हा बैलबाजार अस्तित्वात आला. होळीचा गुलाल खेळून ते परत गावोगावी, खेडोपाडी जाऊन परंपरागत लोहारीचा धंदा करीत स्वत:जवळील बैल शेतकऱ्यांना विकणार आहेत. 

बैलगाडी पूज्य

गडिया लोहार समाजाकरिता बैलगाडी पूज्य आहे. विशिष्ट बनावटीची ही छोटी बैलगाडीच त्यांचे घर आहे. याच बैलगाडीवर खाट उलटी ठेवून ते गावोगावी प्रवास करतात.  भटकंतीदरम्यान उघड्यावरच त्यांचा संसार असतो. विळा, कुऱ्हाडसह अन्य लोखंडी साहित्य, अवजार ते बनवतात. स्त्रिया आजही पारंपरिक पोषाख परिधान करतात अन् कष्टात सहभागी होतात. त्यांच्या जीवनप्रवासात बैलगाडीलाच अधिक मान असून, हीच त्यांची शान आहे. 

नागौर बैल

नागोर बैल सर्वाधिक चपळ व स्फूर्तीवान असतात. हे बैल शेतीकरिता उत्तम असून, १५ ते २० क्विंटलचा भार ते वाहून नेतात. मजबूत घाटीच्या या बैलांचे आयुष्य अधिक असून, शर्यतीतही हे बैल वापरतात. राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात या बैलांचा दरवर्षी मोठा मेळावा भरतो.

Web Title: bull market in amravati many pepole visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.