बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:22 AM2019-08-30T01:22:19+5:302019-08-30T01:22:58+5:30
ब्रिटिशकाळापासून सुरू असलेला चांदूर बाजारातील बैल बाजार विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. या बाजारात दररोज लाखो रुपयांचा बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. त्यासाठी राजस्थान, गुजरात तसेच राज्यातील मराठवाडा व विदर्भातील सुप्रसिद्ध व्यापारी येत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीच्या चुकीच्या धोरणामुळे ऐतिहासिक बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे लाखो रुपये किमतीच्या बैलजोड्या विक्री दरम्यान रस्त्यावर उभे ठेवण्याची वेळ परप्रांतीय व्यापाऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
ब्रिटिशकाळापासून सुरू असलेला चांदूर बाजारातील बैल बाजार विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. या बाजारात दररोज लाखो रुपयांचा बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. त्यासाठी राजस्थान, गुजरात तसेच राज्यातील मराठवाडा व विदर्भातील सुप्रसिद्ध व्यापारी येत होते. मुख्य बैलबाजार रविवारी भरत असला तरीही आठवडाभर बैलजोडीची खरेदी-विक्री होत असे. यामधून दरवर्षी सेसच्या रूपाने लाखो रुपयांचे उत्पन्न स्थानिक बाजार समितीला प्राप्त व्हायचे. यामुळे या बाजारात चांगल्या सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे.
बैलबाजारात खरीदी-विक्रीत गैरव्यवहार होत असल्याचे पोलिसांनी उघड केले होते. यात बाजार समितीच्या सर्व संचालकांना आरोपी करण्यात आले होते. त्यामुळे केवळ बाजाराच्या दिवशीच बैल बाजारात आणावे, असा ठराव घेत संचालकांनी परप्रांतीय बैलजोड्यांना आवाराबाहेर काढले. यामुळे जनावरांची तस्करी वाढली; त्यामुळे विके्रत्यांना व बाजार समितीला मोठा फटका बसला. बाजार समितीच्या चुकीच्या धोरणामुळे उत्पन्नातसुद्धा मोठी घट झाली आहे.
बैलजोड्या रस्त्यावर
बाजार समितीच्या तुघलकी धोरणामुळे या ऐतिहासिक बैलबाजाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परप्रांतातून विक्रीसाठी आणल्या जाणाºया बैलजोड्या आज मुख्य रस्त्यावर बांधण्याची वेळ या विक्रेत्यांवर आली आहे. यामुळे अनेक परप्रांतीय व्यापाऱ्यांनी या ऐतिहासिक बैलबाजाराकडे पाठ फिरवली आहे.
अपघाताची शक्यता
बाजार समितीपुढून जाणारा मार्ग हा मध्य प्रदेशात वाहतुकीसाठी अतिशय कमी अंतराचा असल्याने दिवस-रात्र वाहतूक सुरूच असते. रस्त्यावर लावण्यात येणाºया बैलजोड्यांमुळे या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लाखोंची जोडी मिळण्याचे एकमेव स्थान
राज्यातील मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून सुदृढ, देखण्या बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी चांदूर बाजार येथील बैलबाजारात आणले जात असत. राजस्थानातील नागोर, खिमसरा या भागातील सुप्रसिद्ध बैलजोड्यासुद्धा व्यापारी आणत होते. या जोडीची किंमत लाखोंच्या घरात असते. हे वैभव आता लयाला गेले असून, त्याकडे बाजार समितीने दुर्लक्ष केले आहे.