स्वातंत्र्यानंतर अमरावती जिल्ह्यातील बुलुमगव्हाणमध्ये प्रथमच आली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:15 AM2018-03-20T11:15:13+5:302018-03-20T11:15:24+5:30
दिवसभर राब-राब रानात राबल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर टिमटिमत्या चिमणीच्या ज्योतीवर रात्र घालवणाऱ्या अतिदुर्गम भागातील बुलुमगव्हाण आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी १५ मार्चची रात्र अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली.
गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिवसभर राब-राब रानात राबल्यानंतर सायंकाळी घरी गेल्यावर टिमटिमत्या चिमणीच्या ज्योतीवर रात्र घालवणाऱ्या अतिदुर्गम भागातील बुलुमगव्हाण आदिवासी पाड्यातील रहिवाशांसाठी १५ मार्चची रात्र अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी ठरली. महावितरणने पंतप्रधान सहज बिजली म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून विकासाचा हात देत येथील आदिवासींच्या जीवनात प्रकाश पेरला. कित्येक पिढ्यांनंतर या गावात वीज आल्याने तेथील आदिवासींचे चेहरे आनंदाने फुलले होते.
सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील बुलूमगव्हाण या शंभरेक घरे असलेल्या पाड्यात सायंकाळनंतर अंधाराचेच साम्राज्य राहायचे. वीज काय असते तेच माहित नव्हते. त्यामुळे विजेचे महत्त्व कळणे तर दूरच झाले. वीज नसल्याने नळ नाही. कोणतेही करमणुकीचे साधन नाही. मोबाईल नाही. गावात जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात वीज जरी कळली असेल तरी पण त्यांच्यासाठी आणि पाड्यातील आदिवासींसाठी ते दिवास्वप्नच होते.
महावितरणचे अमरावती परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता सुहास मेत्रे, धारणीचे सहायक जिल्हाधिकारी विजय राठोड, कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक आनंद जोशी यांच्या प्रयत्नाने तसेच अचलपूर कार्यकारी अभियंता दीपक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली नाझिया खान, धारणी उपविभागाचे अभियंता विनय तायडे, ए.एस. पंचभाई, आर.बी.जरोदे व यांच्या पाठपुराव्यामुळे पाड्यापर्यंत वीज पोहचली व 'सौभाग्य' योजनेतून येथील सर्वच घरात वीज देण्यात आली.
स्वतंत्र रोहीत्र, आदिवासी उपयोजनेतून खर्च
महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट असलेले बुलुमगव्हाण हे गाव धारणीपासून ३० ते ३५ किमी. अंतरावर आहे. अतिदुर्गम भागातील या गावात भौगोलिक परिस्थितीमुळे व घनदाट वनांमुळे वीज पोहचविणे महावितरणसाठीही जिकिरीचे होते. यासाठी प्रथम काटकुमर ते बुलुमगव्हाण अशी ५ किमी. उच्च दाबाची विद्युत वाहिनी टाकण्यात आली. पाड्याला वीजपुरवठा करण्यासाठी एक रोहीत्र उभारण्यात आले. यासाठी लागणारा खर्च आदिवासीक्षेत्र उपयोजनेंतर्गत करण्यात आला.
गावात ३० खांबांवर पथदिवे
शंभर घरांची वस्ती असणाऱ्या या गावात सर्व घरी वीज पोहचावी, गावातील मार्गावर पथदिव्यांची सोय करता यावी, यासाठी ३० विजेचे खांब लावण्यात आले. प्रत्येक खांबावर महावितरणच्यावतीने पथदिवेही लावण्यात आले.