‘कलेक्टरां’वर समित्यांच्या अध्यक्षपदांचे ओझे
By admin | Published: June 3, 2014 11:43 PM2014-06-03T23:43:51+5:302014-06-03T23:43:51+5:30
जिल्ह्याचे प्रमुख आणि शासनाचे प्रतिनिधी असलेले कलेक्टर (जिल्हाधिकारी) यांच्या खांद्यावर तब्बल २६१ समितींच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. एवढय़ा समित्यांची जबाबदारी सांभाळताना जिल्हाधिकारी राहुल रंजन
जितेंद्र दखने - अमरावती
जिल्ह्याचे प्रमुख आणि शासनाचे प्रतिनिधी असलेले कलेक्टर (जिल्हाधिकारी) यांच्या खांद्यावर तब्बल २६१ समितींच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. एवढय़ा समित्यांची जबाबदारी सांभाळताना जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
जिल्ह्याचे मुख्य दंडाधिकारी असलेले जिल्हाधिकारी हे पद अतिशय महत्वाचे व मानाचे आहे. त्यांच्या समकक्ष पात्रतेचे इतर अधिकारी कार्यरत असले तरी त्यांच्या पेक्षा जास्तच जबाबदारी जिल्हाधिकार्यांवर असते. व्हीआयपींच्या दौर्यापासून ते अगदी सामान्य माणसाची तक्रार जाणून घेण्यापर्यंत जिल्हाधिकार्यांना तत्पर राहावे लागते. नित्याच्या कामाव्यतिरिक्त सध्या जिल्हाधिकार्यांकडे राजस्व अभियान, कायदा व सुव्यवस्था, सरकारी वसुली, महापालिका हद्दीतील ‘अ’ वर्ग पालिका हद्दीतील समितीचे व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे. याशिवाय ‘अ’ वर्ग पालिका हद्दीतील अकृषक परवानगी, सर्व प्रकारचे भुसंपादन अधिग्रहण, नागरी कमाल जमीन र्मयादा व त्या अनुषंगिक बाबी, नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य, सार्वत्रिक निवडणुका, दशवार्षिक जनगणना, जिल्हा परिषद निवडणुका, पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या याद्या तयार करणे, अवर्षण व आनुषंगिक बाबी सर्वसामान्य समन्वय, रोजगार हमी, इतर रोजगाराच्या कार्यक्रमाची आखणीही त्यांना पाहावी लागते.
जिल्हाधिकार्यांकडील कामाचा वाढता ताण पाहता प्रशासकीय कामकाजासोबतच शासनाने ठरवून दिलेल्या विविध समित्यांची जबाबदारी पार पाडताना प्रशासनाचे जबाबदार प्रमुख म्हणून हा भार क्षमतेपेक्षा अधिक आहे.