कोवळ्या वयात मातृत्वाचे ओझे, वर्षभरात १५ ते १९ वयोगटात ३३८ प्रसूती

By उज्वल भालेकर | Published: July 12, 2024 02:37 PM2024-07-12T14:37:29+5:302024-07-12T14:38:18+5:30

Amravati : लैंगिक शिक्षणाची गरज; बालविवाह, अत्याचार पीडित महिलांचा समावेश

Burden of motherhood at a young age, 338 births in the 15-19 age group per year | कोवळ्या वयात मातृत्वाचे ओझे, वर्षभरात १५ ते १९ वयोगटात ३३८ प्रसूती

Burden of motherhood at a young age, 338 births in the 15-19 age group per year

उज्वल भालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
जिल्ह्यात २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ३६,८४३ महिलांची प्रसूती झाली आहे. या प्रसूतीमध्ये १५ ते १९ या वयोगटातील जवळपास ३३८ महिलांची प्रसूती झाली असून, यातील अनेक मुली या कुमारी माता आहे. विविध लैंगिक अत्याचार तसेच बालविवाहातून या मुली कुमारी माता बनल्याची धक्कादायक माहिती आहे.


कोवळ्या वयात या मुलीवर मातृत्वाचे ओझे लादल्याचे चित्र आहे. बदलती जीवनशैली, समाजमाध्यमांचे तरुणाईवर असणारे गारूड, लैंगिक शिक्षणाचा अभाव, भिन्नलिंगी आकर्षण यासह अन्य काही कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मेळघाट या अतिदुर्गम भागात आजही बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. यातील अनेक बालविवाहाचे प्रकार हे प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती झाल्यावरच उघड होतात. त्यामुळे अनेकवेळा येथील कुमारी गर्भवती महिला ही प्रसूतीसाठी रुग्णालयात भरती होण्याचे टाळतात, लैंगिक अत्याचाराच्या घटनेतून देखील काही मुली या कुमारी माता बनल्या आहेत. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये १५ ते १९ या वयोगटातील ३३८ मुलींची प्रसूती झाली आहे.


अत्याचार पीडित महिलेला कायदेशीर गर्भपाताचा अधिकार 
एखादी मुलगी ही लैंगिक अत्याचारातून जर गर्भवती राहिल्यास तिला गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. २४ आठवड्यांपर्यंत या पीडित महिलेला नको असलेल्या बाळाचा गर्भपात करता येतो.


रुग्णालय प्रशासनाने दिली पोलिसांना माहिती
शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचे वय जर कमी असेल तर रुग्णालय प्रशासनाकडून सदर प्रकरणाची माहिती ही पोलिसांना दिली जाते. जिल्हा स्त्री रुग्णालयात अशा प्रकारच्या काही कुमारी माता प्रसूतीसाठी आल्याचे दिसून आले आहे. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून यासंदर्भातील माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली.


मेळघाटात बालविवाह
मेळघाट हा आदिवासीबहुल क्षेत्र आहे. आजही तेथील आदिवासी बांधव बालविवाहाच्या बंधनातून मुक्त झालेला नाही. या भागात बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहेत.
 

Web Title: Burden of motherhood at a young age, 338 births in the 15-19 age group per year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.