ग्रामपंचायतीच्या तिजोरीत पडली करवसुलीची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:22 AM2021-02-06T04:22:31+5:302021-02-06T04:22:31+5:30
अमरावती : कोरोनामुळे ग्रामीण भागातील नागरिक घरपट्टी व पाणीपट्टीचा कर ग्रामपंचायतीला भरण्यास उदासीन आहेत. मात्र, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ५५३ ...
अमरावती : कोरोनामुळे ग्रामीण भागातील नागरिक घरपट्टी व पाणीपट्टीचा कर ग्रामपंचायतीला भरण्यास उदासीन आहेत. मात्र, अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्याने या काळात रिंगणातील इच्छुक उमेदवारांनी कराचा भरणा केल्याने ग्रामपंचायतीच्या करवसुली भर पडली आहे. वसुलीसाठी आलेल्या ग्रामपंचायतीच्या पथकाला कोरोनाचे कारण करदात्यांकडून सांगण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त इच्छुकांनी थकीत कराची रक्कम भरल्याने थंडावलेली करवसुली पुढे सरकली आहे.
यावर्षी ग्रामपंचायतींची वसुली मोठ्या प्रमाणात थकीत राहण्याची दाट शक्यता होती. परंतु निवडणुकीमुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी थकीत करवसुलीचा फटका अजूनही ग्रामपंचायतींना सोसावा लागत आहे. परिणामी ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासकामांना ब्रेक लागला आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यापासून करवसुलीची मोहीम सुरू होते. गतवर्षी मार्चअखेरपासून ते गणेशोत्सवपर्यंत लॉकडाऊन होता. कोरोनामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती. दिवाळीनंतर सर्व व्यवहार सुरळीत होत गेले. ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता कर,पाणीपट्टी वसुलीची मोहीम या काळात सुरू झाली. ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा होताच गावपातळीवरील निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना कर भरल्याची पावती अनिवाऱ्य असल्याने कराचा भरणा केला. गावपातळीवरील काही उत्साही मंडळींनीही ग्रामपंचायतींचा सदस्य व सरपंच होण्याच्या हौसेखातर थकबाकीसह कर भरला. त्यानिमित्ताने करवसुलीची आकडेवारी डिसेंबरपर्यंत बऱ्यापैकी वाढली आहे. यामुळे ग्रामपंचायतींना ही विकासकामे करण्यासाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.