नागपुरच्या सराईतांकडून मोझरीच्या घरफोडीचा उलगडा, दोघांना अटक
By प्रदीप भाकरे | Published: January 15, 2023 03:10 PM2023-01-15T15:10:13+5:302023-01-15T15:11:08+5:30
नागपुरच्या सराईतांकडून मोझरीच्या घरफोडीचा उलगडा झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
अमरावती : तिवसा शहरालगतच्या गुरूदेवनगर येथील डॉ. रघुनाथ वाडेकर यांच्या घरी झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. १४ जानेवारी रोजी अटक केलेल्या नागपूरच्या दोन सराईत चोरांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून त्या चोरीतील गेलेल्या मालासह गुन्हयात वापरलेली कार देखील जप्त करण्यात आली आहे.
विक्की नथ्थु सोलंकी (२७, रा. खैरी, बुट्टीबोरी नागपूर) व गोपाल दुजेराम दिवांगण (३०, रा. सातगाव, नागपुर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अज्ञात चोराने मोझरी येथील आपल्या बंद घराचा कोंडा तोडून घरातील कपाटामधून दागिने चोरून नेल्याची तक्रार ७ जानेवारी रोजी डॉ. रघुनाथ वाडेकर यांनी तिवसा पोलिसांत नोंदविली होती. ती चोरी विक्की व गोपाल या दुकलीने केल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. दोघांनीही वाडेकर यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली आरोपींकडून त्या घरफोडी गुन्हयातील दागिने तसेच गुन्हयात वापरलेली एम एच १२ एफ पी २९११ ही कार, लोखंडी टॉमी, पाच मोबाईल असा एकूण ३ लाख ६२ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ते आंतरराज्यीय चोरटे
दोन्ही आरोपी हे सराईत चोर असून त्यांच्याविरूध्द भंडारा, वर्धा जिल्हयात तसेच छत्तीसगढ़ राज्यातील दुर्ग जिल्हयात घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहे. या आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक मो. तस्लीम शेख गफुर व मूलचंद भांबुरकर, हवालदार पुरुषोत्तम यादव, उमेश वाकपंजार, मंगेश लकडे सचिन मसांगे, चालक संदीप नेहारे तथा सायबर सेल येथील रितेश वानखडे यांनी केली.