पथ्रोट येथे तीन घरे जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:14 AM2021-02-11T04:14:23+5:302021-02-11T04:14:23+5:30
जीवितहानी टळली, तहसीलदारांकडून सानुग्रह मदत पथ्रोट : येथील वाॅर्ड क्रमांक २ तेलंगखाडी येथील तीन घरे मंगळवारी रात्री ८ ...
जीवितहानी टळली, तहसीलदारांकडून सानुग्रह मदत
पथ्रोट : येथील वाॅर्ड क्रमांक २ तेलंगखाडी येथील तीन घरे मंगळवारी रात्री ८ वाजता लागलेल्या आगीत जळून खाक झाली. या भीषण आगीत घरातील सर्व साहित्य जळाले. मात्र, जीवितहानी टळली.
तेलंगखडी येथील वंदना लक्ष्मण बावनकर यांच्या घराला अचानक आग लागली आणि पाहता पाहता शेजारच्या पद्मा प्रकाश कुंजेकार व सुभाष रामुजी नागापुरे यांच्या गायवाड्याला आगीने घेरले. नागरिकांच्या सतर्कतेने सुभाष नागापुरे यांच्या गायवाड्यात बांधलेले पशू व सिलिंडर ताबडतोब काढण्यात आल्यामुळे जीवितहानी टळली.
दरम्यान, घरातील कुटुंब जीव मुठीत घेऊन बाहेर पडले. आगीची माहिती ताबडतोब अग्निशमन दल, पोलीस ठाण्याला देण्यात आली. ठाणेदार नरेंद्र डबाळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. थोड्याच वेळेत परतवाडा व अंजनगाव सुर्जी येथील अग्निशमक दलाच्या वाहनांनी येऊन आग विझवली तसेच याबाबत माहिती अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव यांना देण्यात आली. तोपर्यंत तिन्ही घरातील उदरनिर्वाहाचे घरगुती साहित्य जळून खाक झाले.
दरम्यान, पथ्रोट येथील आगग्रस्त घरांना तहसीलदार मदन जाधव यांनी बुधवारी दुपारी २ वाजता भेट दिली. तसाठी बजरंग देवकाते व आर. जे. वैद्य यांनी पंचनामा केल्यानंतर तहसीलदारांकडून आगग्रस्तांना पाच हजारांचा सानुग्रह निधी देण्यात आला.