घरगुती सिलिंडरमधून गॅस भरताना पेटली मारुती व्हॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2018 09:10 PM2018-02-03T21:10:34+5:302018-02-03T21:10:51+5:30
स्थानिक एन.टी.आर. शाळेच्या मार्गावर छुप्या मार्गाने मारुती व्हॅनमध्ये घरगुती सिलिंडरमधून गॅस भरत असताना वाहनाने पेट घेतला
वरूड (अमरावती) : स्थानिक एन.टी.आर. शाळेच्या मार्गावर छुप्या मार्गाने मारुती व्हॅनमध्ये घरगुती सिलिंडरमधून गॅस भरत असताना वाहनाने पेट घेतला. आगीत या वाहनाची राखरांगोळी झाली. शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही घटना घडली.
जायन्ट्स चौकातून एन.टी.आर. शाळेकडे जाणाºया रस्त्यावर असलेल्या एका मोटार गॅरेजसमोरील रिकाम्या जागेत शनिवारी सायंकाळी पावणेपाच वाजता एमएच १९ एई ४८६३ या मारुती व्हॅनच्या टाकीत छुप्या मार्गाने घरगुती सिलिंडरमधून गॅस भरणे सुरू होते. काही युवक आणि एक लहान बालकसुद्धा वाहनाजवळ उभे होते. काही क्षणातच मारुती व्हॅनमधून आगीचे लोळ निघू लागले. नागरिकांनी सतर्कता बाळगून आग विझविण्याचा प्रयत्न केला. शेंदूरजनाघाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग विझविली. वरुड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. हा प्रकार आदित्य टायर्सच्या सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झाला आहे. वाहनाने पेट घेताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा तपास ठाणेदार गोरख दिवे, सहायक पोलीस निरीक्षक गट्टे, जमादार दिलीप वासनकरसह वरुड पोलीस करीत आहेत.