धगधगते वास्तव : दर ३० तासात एक आत्महत्या, १० महिन्यांत २६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: November 14, 2023 09:11 PM2023-11-14T21:11:12+5:302023-11-14T21:11:48+5:30
दर ३० तासात एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.
अमरावती : कुणालाही नको असणारा उच्चांक सध्या जिल्ह्यात झालेला आहे. यंदाच्या १० महिन्यात राज्यात सर्वाधिक २६८ शेतकरी आत्महत्या जिल्ह्यात झाल्या आहेत. तर सन २००१ पासून तब्बल ५२१० शेतकऱ्यांनी नैराश्य येऊन मृत्यूला कवटाळले आहे. दर ३० तासात एक शेतकरीमृत्यूचा घोट घेत असल्याचे जिल्ह्याचे वास्तव आहे.
केवळ जिल्ह्यातच नव्हे तर विभागातील बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यातदेखील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. विभागात यंदाच्या दहा महिन्यात तब्बल १९२७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. सततची नापिकी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारी, वसुलीसाठी तगादा, आजारपण, मुलींचे लग्न आदी प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येऊन मृत्यूचा फास घेत आहे.
यंदा जानेवारी महिन्यात २९, फेब्रुवारी १४, मार्च ३०, एप्रिल ३२, मे २८, जून २९, जुलै २६, ऑगस्ट २६, सप्टेंबर ३४ व ऑक्टोबर महिन्यात २० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.