बसचालक तर्राट; अधिकाऱ्यांमुळे सतर्कतेने टळला अनर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 08:57 PM2024-05-22T20:57:14+5:302024-05-22T20:57:26+5:30
एसटी बसच्या मद्यपी चालकावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
अमरावती : मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास नागपूरहून संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटी बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची तक्रार काही सुज्ञ प्रवाशांनी गणेशपेठ आगाराच्या नियंत्रकांना केली. लागलीच त्यांनी अमरावती विभाग नियंत्रकाला याची माहिती दिली. तिवशाहून अमरावतीकडे येत असलेल्या या बसला अमरावती बसस्थानकावर गाठण्याच्या हालचाली सुरू झाल्या. विभाग नियंत्रकांच्या समयसूचकतेने हा गंभीर प्रकार उजेडात आला अन् होणारा अनर्थ टळला.
संभाजीनगरला जाणाऱ्या बसच्या चालकाने चक्क मद्यपान केले होते. ही गंभीर बाब लक्षात येताच अमरावती विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी चक्रे फिरवली. बसस्थानक गाठत त्या मद्यपी चालकाला रंगेहाथ पकडले. नागपूर येथील गणेशपेठ आगाराची बस (एमएच ४० एक्यू ६३८८) २१ मेरोजी नागपूर येथून संभाजीनगरला निघाली. या बसमध्ये ३३ प्रवासी होते. बसचा चालक वाहन व्यवस्थित चालवित नसल्याने त्याने मद्यपान केले असावे, अशी शंका घेत काही प्रवाशांनी हा प्रकार थेट नागपूरच्या विभाग नियंत्रकांना कळविला. प्रवाशांच्या या सूचनेची दखल घेत लगेच विभाग नियंत्रकांनी ही माहिती अमरावतीच्या विभाग नियंत्रकांना रात्री १०:४५ वाजताच्या सुमारास दिली. विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांसमवेत बसस्थानक गाठले. रात्री ११ वाजता बस पोहोचताच बसचालक केशव थोटे याला चौकशी कक्षात नेले. या ठिकाणी प्राथमिक चौकशीत त्याने मद्यपान केल्याचे निदर्शनास आले. बेलसरे यांच्या सूचनेवरून कोतवाली पोलिसांनी चालक केशव थोटे याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध मोटर वाहन कायदा कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यादरम्यान एसटी बस पर्यायी चालक देऊन रवाना करण्यात आली. पुढील कार्यवाही सुरू आहे. काही बसचालक मद्यपान करून वाहन चालवित असल्याच्या तक्रारी हल्ली वाढल्या आहेत. प्रवाशांच्या जीवाशी होत असलेला हा खेळ प्रसंगी अपघाताला आमंत्रणही देतो. याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. परंतु बेलसरे आणि त्यांच्या टीमने या प्रकाराला गांभीर्याने घेतल्याने अनर्थ टळला.