बस प्रवाश्यांना करावा लागतो टपावरून जीवघेणा प्रवास; पालकमंत्र्यांना ३० बसगाड्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:00 IST2025-04-03T14:58:44+5:302025-04-03T15:00:13+5:30
३० बसगाड्या द्या, पालकमंत्र्यांना पत्र : अनेक पाड्यांमध्ये बस नाहीच

Bus passengers have to make a life-threatening journey by train; Demand for 30 buses from the Guardian Minister
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत अतिदुर्गम आदिवासी पाडे तर सोडाच, अगदी रस्त्यावरील गावांमध्येसुद्धा बस जात नसल्याचे वास्तव आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही आदिवासींना खासगी वाहनांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यादरम्यान धारणी व चिखलदरा तालुक्यासाठी मानव विकास संसाधन मंत्रालयामार्फत ३० बसगाड्या देण्याची मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक निवेदनाद्वारे केली.
भंगार बसचे आगार म्हणून कुख्यात परतवाडा आगारात पाच बस नव्याने दाखल झाल्या. परंतु, मेळघाटच्या नशिबी नादुरुस्त व भंगार गाड्याच आहेत. अपघात घडले तरी आदिवासींच्या नशिबी आजही त्या भंगार बस किंवा अवैध प्रवासी वाहनाच्या टपावर, कोंबून प्रवास करावा लागत आहे. मेळघाटच्या नावावर अनेक सुविधा शासन देत असले तरी त्यात मूलभूत सुविधा बेपत्ता असल्याचे चित्र अत्यंत क्लेशदायक आहे.
३०० खेडी आणि बारा बस. धारणी व चिखलदरा तालुक्यात दुर्गम-अतिदुर्गम मिळून जवळपास ३०० आदिवासी पाडे आहेत. मेळघाटात केवळ १२ ते १५ बस आहेत.
धारणी आगार केव्हा?
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व मेळघाटातील धारणी येथे बस आगार याच सरकारने गतवर्षी मंजूर केले. प्रत्यक्ष कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही.
३० बसची मागणी
धारणी व चिखलदरा तालुक्यांत आदिवासींना प्रवास सुविधेसाठी पहिल्या टप्प्यात किमान ३० बसगाड्या देण्याची मागणी आ. केवलराम काळे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनातून केली आहे.
फाट्यावर सोडून जाते बस
आजही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये बस प्रत्यक्ष जात नाही. दीडशेपेक्षा अधिक गावांच्या फाट्यावर बस प्रवाशाला सोडून जाते. तेथून दिवसा व रात्रीही पायी गाव गाठावे लागते.
"आदिवासी पाड्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामान्य नागरिकांना आणि प्रवासासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. नवीन बसगाड्यांतून काही प्रमाणात अडचणी दूर होतील."
- केवलराम काळे, आमदार, मेळघाट