बसस्थानकातील चोरीचा २४ तासांत उलगडा; दोन चोर अटकेत
By प्रदीप भाकरे | Published: December 22, 2022 06:20 PM2022-12-22T18:20:50+5:302022-12-22T18:21:36+5:30
टीम राजापेठची कारवाई
अमरावती : राजापेठस्थित बसस्थानकाहून एका प्रवाशाची ३० हजार रुपये रोख रक्कम लांबविणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. २२ डिसेंबर रोजी त्या गुन्ह्याची २४ तासांच्या आत उकल करण्यात राजापेठ पोलिसांना यश आले. अब्दुल अतीक अब्दुर रफीक (३२, रा. अलीम नगर, अमरावती), ऋषिकेश रमेश मेश्राम (२३, रा. राहुलनगर, फ्रेजरपुरा, अमरावती) व शेख सलीम शेख युसूफ (३०, रा. बडनेरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
वाशिम येथील अभिषेक जगदीश घुगे (३८) हे २० डिसेंबर रोजी अमरावती आले होते. परत वाशिम जाण्याकरिता सायंकाळी ७.३०च्या सुमारास ते राजापेठ बस डेपो येथे आले. वाशिमच्या बसमध्ये बसले. तिकिटाचे पैसे काढण्याकरिता त्यांनी पँटच्या खिशात हात टाकला असता, त्यांना खिशात असलेले ३० हजार रुपये दिसून आले नाही. त्यांनी याबाबत राजापेठ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याअनुषंगाने राजापेठ बस डेपो परिसरात सापळा रचण्यात आला.
घटनास्थळावरून अब्दुल अतीक, ऋषिकेश मेश्राम व शेख सलीम यांना ताब्यात घेण्यात आले. उलटतपासणीदरम्यान त्यांनी घुगे यांचा खिसा कापल्याची कबुली दिली. आरोपी सराईत चोर असून ते सैलानी, हैदराबाद लाइन, नागपूर लाइन, मोठमोठे मेळावे, यात्रा, सिकंदराबाद, जयपूरमधील रेल्वे लाइनमध्ये मोबाइल चोरी, खिसे कापणे, गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी चोरी करीत असतात. अमरावतीमध्येदेखील त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. तीनही आरोपींकडून ३८०० रुपये हस्तगत करण्यात आले. डीसीपी विक्रम साळी व एसीपी पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मनीष ठाकरे यांनी ही कारवाई केली