दुचाकीच्या हेडलाइटमध्ये दडून बसला नाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:04 PM2018-05-31T22:04:00+5:302018-05-31T22:04:00+5:30
सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीच्या दुचाकीच्या हेडलाइटच्या चौकटीत विषारी नाग दडून बसला होता. रात्री २ वाजता सर्पमित्रांनी त्या नागाला जिवंत पकडून जंगलात सोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीच्या दुचाकीच्या हेडलाइटच्या चौकटीत विषारी नाग दडून बसला होता. रात्री २ वाजता सर्पमित्रांनी त्या नागाला जिवंत पकडून जंगलात सोडले. सध्या अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा कालावधी आहे. त्यामुळे वसतिगृहातील बहुतांश रात्रभर अभ्यास करतात. बुधवारी उशिरा रात्री यादरम्यान बाहेर आलेल्या मुलीला तिच्या स्कूटीच्या दिवा आणि हँडलच्या खाच्यात काही तरी चमकदार दृष्टीस पडले.
रात्री २ वाजता मोहीम फत्ते
विद्यार्थिनीने निरीक्षक केले असता, तो चक्क नाग होता. विषारी असल्यामुळे त्याला तसेच ठेवणे शक्य नसल्याने वसतिगृह प्रशासनाकडून रक्षक वन्यजीव संरक्षण व बहुउद्देशीय संस्थे संस्थेचे सर्पमित्र चेतन आडोकार व धीरज शिंदे यांना माहिती देण्यात आली. रात्री २ वाजतादेखील कुठलाही कंटाळा न करता संस्थेचे ठकसेन ऊर्फ तुषार इंगोले व मंगेश तवाडे वसतिगृहाच्या आवारात दाखल झाले आणि हँडलच्या पोकळीतून नागाला सुखरूप बाहेर काढण्याची मोहीम फत्ते केली. यानंतर त्याला जंगलात सोडून देण्यात आले.
नाग हा विषारी प्राणी असल्याने त्याबाबत सावधगिरी बाळगायला हवी. रात्रीच्या वेळी किंवा दोन-तीन दिवस वाहन कुठे ठेवल्यास आधी एखादा विषारी प्राणी तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी.
- तुषार इंगोले, सर्पमित्र