चल लग्न करू म्हणत केला अतिप्रसंग!
By प्रदीप भाकरे | Updated: May 6, 2024 18:04 IST2024-05-06T18:03:34+5:302024-05-06T18:04:36+5:30
मोर्शी तालुक्यातील घटना : आरोपीला तत्काळ अटक

By making false promises of marriage a man forces woman to get into physical relationship
अमरावती : एका २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष देऊन घरी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. २४ एप्रिल रोजी रात्री ११ ते पहाटे पाचच्या सुमारास ती घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून ४ मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. तथा आरोपी मंगेश भीमराव कापसे (२७, रा. ता. मोर्शी)) याच्याविरुद्ध बलात्कार व ॲट्राॅसिटीचा गुन्हा नोंदवून त्याला ५ मे रोजी अटक करण्यात आली.
तक्रारीनुसार, २१ वर्षीय फिर्यादी हिला आरोपीने फोन कॉल करत गावाच्या बाहेर भेटायला बोलाविले. २४ एप्रिल रोजी सकाळी ११ च्या सुमारास ती त्याला भेटायला गेली असता, मी तुला न्यायला आलो आहे. तु माझ्यासोबत गावाला चल आपण दोघेजण लग्न करू, अशी बतावणी त्याने केली. ती आरोपीच्या गाडीवर बसून दोघेही मोर्शी येथे आले. दरम्यान आता रात्र झाली आहे, तु माझे घरी चल, असे आरोपी म्हणाला. त्यामुळे ती मंगेश कापसे याच्यासोबत त्याच्या घरी गेली. रात्री ११ च्या सुमारास ती त्याच्या घरी पोहोचली असता त्याचे कुटुंबीय झोपलेले होते. त्यामुळे तु स्लॅपवर झोप, मी खाली झोपतो. उद्या तुला घरी सोडून देतो, असे आरोपीने तिला बजावले. ती स्लॅपवर झोपायला गेली असता एक ते दीड तासानंतर आरोपी हा तिच्याजवळ आला. मी तुझ्यावर प्रेम करतो, मला शरीरसंबंध स्थापित करू दे, अशी मागणी त्याने केली. त्यावर तरुणीने नकार दिला असता आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.
पिडितेला मावशीच्या घरी सोडले
आरोपी मंगश कापसे याने २५ एप्रिल रोजी पहाटे पाचच्या सुमारास तिला तिच्या मावशीच्या घरी सोडून दिले. तो नामानिराळा झाला. ती घरी पोहोचली. मात्र स्वत:सोबत झालेले अघटित तिला स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांच्या कानावर घातला. त्यांनी तिला धीर देत पोलिस तक्रार करण्याची सूचना केली. त्यानुसार, त्या २१ वर्षीय तरुणीने ४ मे रोजी रात्री मोर्शी पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविली.