बैतुल मार्गावरील वळणमार्ग गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 05:00 AM2020-09-13T05:00:00+5:302020-09-13T05:00:34+5:30
परतवाडा बैतूल वळण मार्ग पूल वाहून गेल्याने शुक्रवारी रात्री मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी शनिवारी पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक सर्फापूर कारंजा, बहिरम या वळण मार्गाने वळविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गअंतर्गत बैतूल ते अकोटपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात ठिकठिकाणी असलेल्या लहान मोठ्या पुलांच्या कामाला सुरुवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शुक्रवारी रात्री परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे परतवाडा मार्गावरील खरपी निंभोरानजीक तयार करण्यात आलेला वळण मार्ग पूल पूर्णत: वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. या पावसामुळे परिसरातील संत्रा व इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
परतवाडा बैतूल वळण मार्ग पूल वाहून गेल्याने शुक्रवारी रात्री मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. परिणामी शनिवारी पहाटेपासून या मार्गावरील वाहतूक सर्फापूर कारंजा, बहिरम या वळण मार्गाने वळविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गअंतर्गत बैतूल ते अकोटपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात ठिकठिकाणी असलेल्या लहान मोठ्या पुलांच्या कामाला सुरुवात झाली. काही ठिकाणी निर्मितीचे काम सुरू आहे. पर्यायी वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गावरील हा पूल होता. शुक्रवारी कारंजा बहिरम या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाले चांगले ओसंडून वाहू लागले. त्या पाण्यात खरपी निंभोरा नजीकचा वळण मार्ग पूल वाहून गेला. त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
तूर, कापूस, संत्रा, ज्वारीला फटका
शुक्रवारी रात्री मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे तूर, कापूस या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याची माहिती कारंजा बहिरम येथील शेतकरी प्रवीण चौधरी यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिली. जमिनीत मोठ्या प्रमाणात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ओल असताना शुक्रवारी झालेल्या पावसाचे पाणी अनेक शेतात झिरपून निघून गेले. तर संत्रा पिकाची गळती होण्याची भीती वर्तविली जात आहे.
शुक्रवारी मुसळधार पावसामुळे वळण मार्ग पूल पूर्णत: वाहून गेला. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. वाहतूक सर्फापूरमार्गे वळविण्यात आली आहे.
-पी. एस. वासनकर,
अभियंता, राष्ट्रीय महामार्ग