सीए आणि बी.कॉमच्या परीक्षा एकाच दिवशी, विद्यार्थ्यांची कोंडी
By गणेश वासनिक | Published: May 7, 2023 08:43 PM2023-05-07T20:43:19+5:302023-05-07T20:43:29+5:30
शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ उन्हाळी २०२३ वाणिज्य शाखेच्या बी.कॉम सेमिस्टर -६ आणि दिल्ली येथील दि इन्स्टिट्ययूट ऑफ चार्टंड अकाऊंन्टस् ऑफ इंडिया यांच्यामार्फत घेण्यात येणारी सीएची परीक्षा एकाच दिवशी असल्याने वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची कोंडी होणार आहे. सीए करण्याचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने बी.काॅम पक्षांच्या वेळापत्रकात बदल करावा, अशी मागणी होत आहे.
दि इन्स्टिट्ययूट ऑफ चार्टंड अकाैंन्टस् ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या सीए परीक्षांचे वेळापत्रकानुसार इंटरमिजिएट कोर्स ग्रुप एकची परीक्षा ३, ६, ८ व १० मे रोजी होऊ घातली आहे तर ग्रुप दोनची परीक्षा १२, १४, १६ व १८ मे २०२३ रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने सीएच्या परीक्षार्थीनी १० जानेवारी २०२३ रोजी कळविण्यात आले आहे. मात्र, विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा २०२३ चे नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा ११ मे पासूनचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
विशेषत: वाणिज्य शाखेच्या बी.काॅम सेमिस्टर ६ च्या परीक्षा १६, १८ व २० मे रोजी होत आहे. त्यात इंग्रजी, मातृभाषा, मॅनेजमेंट अकाैंट हे महत्त्वाचे पेपर होणार आहे. वाणिज्य शाखेच्या बी.काॅम सेमिस्टर ६ चे बहुतांश विद्यार्थी हे सीएच्या परीक्षांना सामोरे जात आहे. तथापि, बी.कॉम आणि सीए या दोन्ही परीक्षा साधारणत: एकाच दिवशी येत असल्याने नेमकी कोणती परीक्षा द्यावी आणि कोणती टाळावी, ही गंभीर समस्या पालकांसह विद्यार्थ्यांसमोर उद्भवली आहे.
सीए परीक्षांचे वेळापत्रक जानेवारीमध्ये जाहीर झाले आहे. आता विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. सीए ग्रृप एकच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ झाला आहे. बहुतांश विद्यार्थी सीएच्या परीक्षांना प्राधान्य देत आहेत. एकाच वेळेस दोन्ही परीक्षा देेणे शक्य नाही. - उन्नती मुरकुटे, यवतमाळ
परीक्षांचे वेळापत्रक बदलविण्यास कुलगुरूंची मान्यता नाही. वाणिज्य शाखेचे लाखो विद्यार्थी असून, तसे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षांचा कालावधी निश्चित असतो. तथापि, सीएच्या परीक्षा देणारे विद्यार्थी संख्या तोकडी असते. आता वेळापत्रकात बदल करता येणार नाही.
- मोनाली तोटे, प्रभारी संचालक परीक्षा व मूल्यापन मंडळ, अमरावती विद्यापीठ.