‘सीएए’, ‘एनआरसी’ विरोधात संमिश्र बंद, निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 06:00 AM2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:56+5:30
जमावाने मालवीय चौकातील प्रतिष्ठाने बंद करताना तुरळक दगडफेक केली. स्थानिक इर्विन चौकात बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० पासूनच समर्थकांची गर्दी जमली होती. शहरातील चित्रा चौक ते पठाण चौकापुढे मुस्लिमबहुल भागातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने कडेकोट बंद होती. चपराशीपुरा परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तथापि, शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने सुरू असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र शासनाने लागू केलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व दुारुस्ती (सीएए), नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (एनआरसी) या कायद्याविरूद्ध बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या भारत बंदला अमरावतीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. येथील इर्विन चौकात निदर्शने करून या कायद्याचा कडाडून विरोध नोंदविला. जमावाने मालवीय चौकातील प्रतिष्ठाने बंद करताना तुरळक दगडफेक केली.
स्थानिक इर्विन चौकात बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० पासूनच समर्थकांची गर्दी जमली होती. शहरातील चित्रा चौक ते पठाण चौकापुढे मुस्लिमबहुल भागातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने कडेकोट बंद होती. चपराशीपुरा परिसरात दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तथापि, शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने, दुकाने सुरू असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात तास, दोन तासांत गर्दी हजारोंच्या संख्येत झाली. यानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, क्यूआरटी पथक, डीबी स्क्वॉड, गाडगेनगर, शहर कोतवाली व वाहतूक पोलीस शाखा आदी यंत्रणेने मार्चेकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इर्विन चौकात ठिय्या दिला. मात्र, बंदच्या अनुषंगाने एकवटलेल्या गर्दीचा फटका इर्विन चौकातील वाहतुकीला बसला. येथून होणारी वाहतूक सकाळी ११ नंतर वळविण्यात आली. ती सायंकाळपर्यंत तशीच ठेवण्यात आली. बहुजन क्रांती मोर्चाचे सुनील डोंगरदिवे, विवेक कडू, पंचशीला मोहोड, प्रफुल्ल गवई, भीम आर्मीचे अकबर खान, उलेमा संघटनेचे हाफीज नाजीम, मौली अब्दुल्ला, मुश्कीफ अहमद हाफीज, उलमा हजरात आदींनी धुरा सांभाळली.
अर्धनग्न आंदोलनातून
‘हमे चाहिये आझादी...’
बंदच्या पार्श्वभूमीवर स्थानिक इर्विन चौकात एकत्रित आलेल्या मुस्लिम बांधवांपैकी काही युवकांनी अर्धनग्न आंदोलनाद्वारे ‘हमे चाहिये आझादी’ अशी जोरदार नारे देत लक्ष वेधले. यावेळी युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात नारेबाजी देण्यात आली. ‘सीएए’, ‘एनआरसी’ रद्द करण्याच्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. ‘डीएनए’च्या आधारावर ‘एनआरसी’ लागू करण्याची मागणी करण्यात आली.
मालवीय चौकात तुरळक दगडफेक
इर्विन चौकात एकत्रित आल्यानंतर जमावाने मालवीय चौकातील दुकाने बंद करण्यासाठी त्या दिशेने धाव घेतली. डफरीन रुग्णालय वळणमार्गालगतची काही दुकाने बंद करण्यासाठी आंदोलकांनी दगडफेक केली. यात कोणत्याची प्रकारने नुकसान झाले नाही. परंतु, काही वेळ पोलिसांची तारांबळ उडाली. अवघ्या १० मिनिटांतच मालवीय चौक ते इर्विन मार्गावरील दुकाने बंद झाली, हे विशेष.
वाहने उचलण्याची कारवाई होेताच उडाला गोंधळ
स्थानिक इर्विन चौकात बंदच्या समर्थनार्थ एकवटलेल्या नागरिकांनी त्यांची वाहने रस्त्याच्या कडेला उभे केली होती. काही वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्यामुळे शहर वाहतूक शाखेने ती उचलण्यासाठी वाहन बोलावले. जमावाने प्रचंड विरोध केला व पोलिसांच्या वाहनापुढे निदर्शने केली. अखेर रस्त्यालगतची वाहने न उचलता सदर वाहन रिकामे परतले. त्यानंतर जमावाने एकच जल्लोष केला.