हॉटेलमधील आगीत गुदमरुन केबल नेटवर्क अधिकाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 05:00 AM2021-09-01T05:00:00+5:302021-09-01T05:00:58+5:30
हाॅटेलच्या सहा रूममध्ये सहा ग्राहक होते. पैकी दुबे, शेलार, पाटील, चौरसिया व शहा या पाच जणांना राजापेठ पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. ठाणेदार मनीष ठाकरे व त्यांची टीम लागलीच घटनास्थळी पोहोचली. पीएसआय कृष्णा मापारी, कर्मचारी दुलाराम देवकर, अमोल खंडेझोड, राहुल ढे॑गेकर, नीलेश पोकळे, अतुल स॑भे, दानिश शेख, प्रशांत गिरडे, ढवळे यांनी प्राणाची बाजी लावत त्यांना हॉटेलबाहेर काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास घडली. दिलीप चंद्रकांत ठक्कर (५४, रा. जमुना क्रमांक ३, सीए रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचे जावई चेतन तेली (एकनाथपूरम) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी हॉटेल संचालक रितेश लुल्ला (३२. रामपुरी कॅम्प) विरूद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेने हॉटेलमधील सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली.
इम्पेरिया या चार माळ्याच्या हॉटेलमधील तिसऱ्या मजल्यावर १३ खोल्या असून, त्यासमोरच इलेक्ट्रिक पॅनेल आहे. त्याला रात्री २ नंतर शार्टसर्किटने आग लागली. ती आग धुमसत असतानाच धुराचा प्रचंड लोळ उठला. पुरेशी जागा नसल्याने तो धूर खोलीत शिरला. त्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये देखील व्हेंटिलेशन नव्हते.
२०२ मध्ये मिळाला मृतदेह
जीटीपीएल या केबल नेटवर्कचे विदर्भ व्यवस्थापक असलेले ठक्कर हे खोली क्रमांक २०५ मध्ये थांबलेले होते. त्यांचे पुण्याचे सहकारी दीपेश शहा हे बाजूच्या खोलीत होते. पळापळ झाली तेव्हा, ठक्कर खोलीतून बाहेर पडले. मात्र, पॅसेजमध्ये अंधार व धूर साचल्याने ते बाहेर पडू शकले नाही. त्यांचा मृतदेह खोली क्रमांक २०२ मध्ये आढळून आला.
‘ते’ पाच जण सुखरूप
हाॅटेलच्या सहा रूममध्ये सहा ग्राहक होते. पैकी दुबे, शेलार, पाटील, चौरसिया व शहा या पाच जणांना राजापेठ पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. ठाणेदार मनीष ठाकरे व त्यांची टीम लागलीच घटनास्थळी पोहोचली. पीएसआय कृष्णा मापारी, कर्मचारी दुलाराम देवकर, अमोल खंडेझोड, राहुल ढे॑गेकर, नीलेश पोकळे, अतुल स॑भे, दानिश शेख, प्रशांत गिरडे, ढवळे यांनी प्राणाची बाजी लावत त्यांना हॉटेलबाहेर काढले.
ना इमरजंसी एक्झिट, ना फायर ऑडिट
हॉटेलमध्ये इमरजंसी एक्झिटअभावी ग्राहकाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. बाहेर पडण्याच्या मार्गात आग लागल्याने रस्ता अवरूद्ध झाला. त्यामुळे ठक्कर हे बाहेर निधू शकले नाही. या हॉटेलचे फायर ऑडिट झाले नसल्याचे चौकशीत सांगण्यात आले.