केबल पाण्याखाली; चिखल रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:17 AM2018-08-20T01:17:15+5:302018-08-20T01:18:14+5:30
भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या नाल्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अनेक परिसरात चिखलमय परिस्थिती ओढवली आहे. खड्डे व नाल्यांच्या आजूबाजूला टाकलेली माती रस्त्यावर आल्याने अपघातही वाढले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या नाल्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अनेक परिसरात चिखलमय परिस्थिती ओढवली आहे. खड्डे व नाल्यांच्या आजूबाजूला टाकलेली माती रस्त्यावर आल्याने अपघातही वाढले आहेत.
शाळा, रुग्णालयांसह नागरी वस्तीत रस्त्याच्या एका बाजूला महावितरणकडून केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. सुमारे ३२० किमी ही भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी सप्टेंबरची डेडलाइन दिल्याने महावितरण व संबंधित एजंसीने भर पावसात मोठे खोदकाम केले आहे. खोदकामातून निघालेली माती त्याच परिसरात टाकण्यात आली. मात्र, काल-परवाच्या मुसळधार पावसाने केबल टाकण्यासाठी खोदलेल्या नालीत पाणी साचले व आजूबाजूची माती चिखलात रूपांतरित झाली. या पार्श्वभूमीवर मुधोळकरपेठ व देवरणकरनगरमध्ये पाहणी केली असता, महावितरणची बेपर्वा वृत्ती अधोरेखित झाली आहे. एकीकडे मजीप्राच्या जलवाहिनींवर महावितरणची एजंसी भूमिगत केबल अंथरत असल्याने त्या कामाचा विरोध होऊ लागला आहे. मागील अनेक दिवसांपासून खोदून ठेवलेल्या नालींमध्ये अद्यापपर्यंत केबल टाकण्यात न आल्याने नागरी वसाहतीला चिखलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डॉ. मनोज निचत यांच्या रुग्णालयासमोर खोदून ठेवलेली नाली व त्यावरील मातीने या भागात प्रचंड चिखल झाला आहे. रूग्णालयात, शाळेत जाण्यासाठीही या भागात रस्ता उरला नाही.